राजापूर : मुंबई-गोवा महामार्गावर ओणी बाजारपेठेतील दोन सराफी दुकाने फोडून चोरट्यांनी दागिने लंपास केले. याप्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या घटनेत सुमारे पावणे दोन लाखांचा ऐवज चोरीला गेल्याचा अंदाज आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर भर बाजारपेठेत चोरी झाल्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महामार्गावरील तालुक्यातील ओणी बाजारपेठेत खरवते येथील सूर्यकांत सागवेकर, तर चुनाकोळवण येथील रवींद्र देवरूखकर यांची ज्वेलर्सची दुकाने आहेत. देवरूखकर यांचे दुकान ओणी-कळसवली तिठ्यालगत, तर सागवेकर यांचे दुकान मुख्य बाजारपेठेत आहे. गुरुवारी(ता. २४) सायंकाळी नेहमीप्रमाणे दुकानांचे मालक दुकाने बंद करून आपापल्या घरी गेले. काल(ता. २५) सकाळी ते नेहमीप्रमाणे दुकाने उघडण्यासाठी आले असता दुकानांच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी दुकानातील किमती वस्तू चोरून नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या प्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत पंचनामा आणि गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या घटनेत सुमारे पावणे दोन लाखांचा सोन्या-चांदीचा ऐवज चोरीला गेल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:00 AM 26/Oct/2024