खेड : खेड तालुक्यातील कळंबणी येथे बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या अकबर अबू शेख या बांगलादेशी नागरिकाला खेड येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री. एस. एम. चव्हाण यांनी एक वर्ष कारावास आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. शनिवार, दि. ६ डिसेंबर २०२५ रोजी या खटल्याचा अंतिम निकाल देण्यात आला.
प्राप्त माहितीनुसार, अकबर अबू शेख हा बांगलादेशी नागरिक कळंबणी गावात वास्तव्यास होता. दि. ११ मार्च २०२५ रोजी कळंबणी आपेडे फाटा येथील हॉटेल स्वामी लिला जवळील बांधकाम साईटवर तो संशयास्पद परिस्थितीत आढळून आला. माहिती मिळताच खेड पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याच्याकडे वैध कागदपत्रे किंवा भारतात प्रवेशासाठी आवश्यक असलेले पारपत्र नसल्याचे उघड झाले. या प्रकरणी दहशतवादी विरोधी पथकाचे पोलीस हवालदार आशिष वसंत शेलार यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार गुन्हा रजि. नं. ७२/२०२५ अंतर्गत पारपत्र भारतात प्रवेश नियम १९५० चा नियम ३ सह ६, परकीय नागरिक आदेश १९४८ परी. ३(१) (अ), तसेच परकीय नागरिक कायदा १९४६ चे कलम १४ यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला.
हा खटला खेड न्यायालयात केस नं. ५९/२०२५ म्हणून चालविण्यात आला. सरकारी पक्षाची बाजू अॅड. श्रीमती विद्या गायकवाड यांनी प्रभावीपणे मांडली. प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी केला तर प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांनी जबाबदारी सांभाळली. न्यायालयीन पैरवी हवालदार ४६९ श्री. गायकवाड यांनी केली. सर्व पुरावे, दस्तऐवज आणि साक्षांचा विचार करून न्यायालयाने आरोपी अकबर अबू शेख याला परकीय नागरिक कायदा १९४६ च्या कलम १४ नुसार दोषी ठरवले. त्यानुसार त्याला एक वर्ष कारावास आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. न्यायालयाच्या या निर्णयाने परिसरात कायद्याचे पालन आणि सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण संदेश दिला असल्याचे स्थानिकांकडून व्यक्त केले जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:38 PM 09/Dec/2025












