दापोली : दापोली तालुक्यातील सारंग परिसरात एका ४० वर्षीय तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दोन-तीन दिवस घरात लाईट न दिसल्याने ग्रामस्थांना संशय आला आणि त्यांनी घराची चौकशी केली असता हे भयावह वास्तव समोर आले. रुपेश दामु मोहीते (वय ४०, रा. सारंग बौद्धवाडी) अशी मृत व्यक्तीची ओळख आहे.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपेश मोहीते गेली दोन-तीन दिवस घरात एकटाच होता. घरात लाईट लागत नसल्याचे लक्षात येताच गावातील राहुल बाळाराम मोहिते यांना त्यांच्या नातेवाईक वसंत गंगाराम मोहिते यांनी फोन करून ही बाब सांगितली. त्यानंतर वसंत मोहिते आणि सुनील गमरे यांनी रुपेशच्या घरी जाऊन पाहणी करण्याचे ठरवले. त्यांनी घराच्या दरवाजावर जोरात धक्का दिल्यास दरवाजा उघडला. घरात प्रवेश करताच हॉलशेजारील खोलीत त्यांनी लाकडी शिडी आणि त्यावरून छताच्या लोखंडी अँगलला बांधलेली नायलॉनची दोरी पाहिली. रुपेशने त्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसताच सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली.
ग्रामस्थांनी तातडीने त्याला दापोली उपजिल्हा रुग्णालयात हलवले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच गावाच्या पोलीस पाटील सुचिता संतोष पेंढारी यांनी दापोली पोलिसांसह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी प्राथमिक तपासात कौटुंबिक वादामुळे हा निर्णय घेतला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. आत्महत्येच्या वेळी रुपेश हा पूर्णपणे एकटाच होता. त्याची पत्नी मुलांसह माहेरी गेली होती, तर आई मुंबईतील बहिणीकडे गेली होती. उत्कृष्ट गवंडी म्हणून ओळख असलेल्या रुपेशच्या मृत्यूने त्याच्या मित्रपरिवारासह संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. या घटनेची नोंद दापोली पोलीस ठाण्यात करण्यात आले असून पुढील तपास दापोली पोलीस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:28 PM 09/Dec/2025














