आपण समाजसुधारकांना जाती-मातीमध्ये बांधून ठेवले हे कुठेतरी थांबले पाहिजे : बाबुराव सूर्यवंशी

आबलोली : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेले संविधान हे न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांवर आधारित आहे. कलम १९ अंतर्गत आपण बोलतो, भाषण करतो. हे स्वातंत्र्य संविधानाने आपल्याला दिले. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठ्यांचे, बाबासाहेब आंबेडकर बौद्धांचे, संत रोहिदास चर्मकार समाजाचे, महात्मा फुले माळी समाजाचे, संत तुकाराम कुणबी समाजाचे अशा पद्धतीने आपण सर्व समाज सुधारकांना जाती-मातीमध्ये बांधून ठेवले आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे,” असे स्पष्ट प्रतिपादन निर्मल ग्रामपंचायत आबलोली या ग्रामपंचायतीचे अधिकारी बाबुराव सूर्यवंशी यांनी केले.

गुहागर तालुक्यातील आबलोली येथील आनंदवन बुद्ध विहार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहात महामानव, बोधीसत्व भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाणदिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.

सूर्यवंशी पुढे म्हणाले की, “संविधानाने दिलेली न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता सामाजिक, धार्मिक असेल, राजकीय असेल ही टिकवण्यासाठी बाबासाहेबांचे विचार या समाज जीवनामध्ये पोहोचले पाहिजेत. ते विचार आपण प्रत्येकाने आचरणात आणले पाहिजेत. त्याच वेळेला खऱ्या अर्थाने डॉ. आंबेडकर यांचा विचार आपण सर्वांपर्यंत पोहोचू शकतो.”

या प्रसंगी सरपंच सौ. वैष्णवी नेटके, अविनाश कदम, शिवराम यादव, बापू पवार, सुरेश पवार, दत्ताराम कदम यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर आनंदवन बुद्ध विहारचे अध्यक्ष दत्ताराम कदम, संघटनेचे अध्यक्ष सुरेश पवार, चिटणीस अविनाश कदम, सरपंच सौ. वैष्णवी नेटके, ग्रामपंचायत सदस्या सौ. पायल गोणबरे, सौ. शैला पालशेतकर, सौ. रूपाली कदम, सुरेश पवार, बापू पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बुद्ध पूजा पाठ, बुद्ध वंदना घेण्यात आली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. शेवटी शेवटच्या सरणायतेने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सरचिटणीस अविनाश कदम यांनी सर्वांचे आभार मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:41 PM 09/Dec/2025