रत्नागिरीत भूमिगत विद्युत वाहिनी प्रकल्प रखडला; नगर परिषद आणि महावितरणमध्ये निधीवरून तिढा

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील वीज वितरण प्रणाली अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम करण्यासाठी आखण्यात आलेला महत्त्वाकांक्षी भूमिगत वीज वाहिनी प्रकल्प निधीअभावी रखडला आहे. महावितरणने १० कोटी रुपयांचा प्रकल्प प्रस्तावित केला असला, तरी रत्नागिरी नगर परिषदेने या कामासाठी तब्बल १५ कोटी ९९ लाख रुपयांचे सुधारित अंदाजपत्रक दिल्याने प्रकल्पाच्या अंमलबजावणीत मोठा अडथळा निर्माण झाला आहे.

या निधीच्या तफावतीमुळे दोन्ही यंत्रणांमध्ये समन्वय साधला जात नसल्याने, परिणामी शहराच्या अनेक महत्त्वाच्या भागांतील भूमिगत वाहिन्यांचे काम थांबले आहे. प्रकल्पाची व्याप्ती आणि अपेक्षित कामही प्रामुख्याने रत्नागिरी शहरातील फिडर अंतर्गत येणाऱ्या प्रमुख क्षेत्रांसाठी निश्चित करण्यात आला आहे. यात खालील ठिकाणांचा समावेश आहे.

मारुती मंदिर, साळवी स्टॉप, सन्मित्रनगर या प्रकल्पांतर्गत शहराच्या या महत्त्वाच्या भागांतील एकूण ४८ किलोमीटर लांबीच्या वीज वाहिन्या भूमिगत केल्या जाणार आहेत. यामध्ये उच्च दाब ३४ कि.मी., लघुदाब १४ कि.मी., एकूण ४८ कि. मी. याचा समावेश आहे. या प्रकल्पासाठी महावितरणने १० कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित धरला होता.

मात्र, नगर परिषदेने कामाचा तपशील आणि आवश्यक खर्चाचा आढावा घेतल्यानंतर १५ कोटी ९९ लाख रुपये इतका खर्च लागणार असल्याचे इस्टिमेट महावितरणकडे सादर केले आहे. जवळपास ६० टक्क्यांहून अधिक रकमेची तफावत असल्याने महावितरणने या निधीला अद्याप हिरवा कंदील दाखवलेला नाही, त्यामुळे रत्नागिरी शहराच्या अनेक भागांत भूमिगत वीज वाहिनीचे काम पूर्णपणे थांबले आहे. वीज वाहिन्या भूमिगत झाल्यास नैसर्गिक आपत्ती दरम्यान (उदा. वादळ, पाऊस) वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण कमी होईल, शहराचे विद्रुपीकरण थांबेल आणि विजेचा धोका कमी होईल. मात्र, निधीच्या वादामुळे रत्नागिरीकरांना या फायद्यांपासून वंचित राहावे लागत आहे. दोन्ही यंत्रणांनी तातडीने बैठक घेऊन निधीचा तिढा सोडवावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:56 AM 10/Dec/2025