चिपळूण : तालुक्यातील खेर्डी येथील आकाश लकेश्री यांनी अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या हिमालयीन एक्स्ट्रीम ट्रायथलॉन स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवून चिपळूणचे नाव उंचावले आहे. एकूण ८ तास ५२ मिनिटांत ही आव्हानात्मक स्पर्धा पूर्ण करत त्यांनी पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी पात्रता मिळवली आहे.
हिमालयीन एक्स्ट्रीम ट्रायथलॉन ही जगातील सर्वाधिक अवघड स्पर्धापैकी एक मानली जाते. या स्पर्धेत पोहणे, सायकलिंग व धावणे या तीन टप्प्यांचा समावेश असतो. प्रचंड थंड वातावरण, खडतर पर्वतीय मार्ग, कमी ऑक्सिजन आणि तीव्र चढ-उतार यांच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंना आपली शारीरिक व मानसिक क्षमता सिद्ध करावी लागते. या स्पर्धेत आकाश लकेश्री यांनी पोहण्याच्या २.८
किलोमीटर अंतरासाठी १७ ते १८ अंश तापमानाच्या थंड पाण्यात अवघ्या ५३ मिनिटांचा वेळ घेतला. त्यानंतरच्या ८८ किलोमीटर सायकलिंग टप्प्यात २,४०० मीटर चढाचा सामना करीत चार तास २७ मिनिटांत त्यांनी हा टप्पा पूर्ण केला. शेवटचा आणि सर्वात कठीण मानला जाणारा २१ किलोमीटर धावण्याचा टप्पा १,७०० मीटर चढासह तीन तास २१ मिनिटांत पूर्ण करीत त्यांनी एकूण आठ तास ५२ मिनिटांत स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली.
हिमालयीन स्पर्धेच्या तयारीसाठी त्यांनी लेह-लडाख येथे कठोर प्रशिक्षण घेतले. त्या काळात भारत-पाकिस्तान तणावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत ते लेहमध्येच अडकले होते. मात्र, प्रतिकूल परिस्थिती असूनही त्यांनी सराव सुरू ठेवत जिद्दीच्या जोरावर आजचे उल्लेखनीय यश प्राप्त केले. आजवरच्या आपल्या या प्रवासात अभिजित यादव, सचिन खेर, संजय इथापे, विजय अनपट, शंतनु शितोळे यांचे मार्गदर्शन लाभल्याचे त्यांनी सांगितले. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ते भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 AM 10/Dec/2025














