संविधानाचे रक्षण सर्वांची जबाबदारी : विश्वदास लोखंडे

मंडणगड : विविध जाती-पातींमध्ये विखुरलेल्या भारतीय समाजामध्ये खऱ्याअर्थाने समता आणण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आहे. भारतीय संविधानाचे रक्षण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे सहकार्यवाह विश्वदास लोखंडे यांनी केले.

येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिन व डॉ. आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून आयोजित ‘शाहू-फुले-आंबेडकर’ सप्ताह सांगता कार्यक्रमात ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, जागतिक विचारवंतांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव अग्रगण्य आहे. ते राष्ट्रपुरुष समाजशिल्पी तसेच भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत चिंतन करणारे अर्थतज्ज्ञ होते. त्यांचे विचार समजून घेऊन त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने वाटचाल केली पाहिजे. त्यांचे संपूर्ण जीवन समाज व राष्ट्रसमर्पित होते. म्हणूनच सर्वांनी त्यांचे जीवन व कार्य समजावून घेतले पाहिजे. संपूर्ण देशाच्या उद्धारासाठी त्यांनी आपले सर्वस्व अर्पण केले होते. अशा या थोर नेत्याचा आदर्श विद्यार्थ्यांनी आपल्या डोळ्यांसमोर ठेवला पाहिजे.

या कार्यक्रमाचे आयोजन विद्यालय अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, एन. एस. एस. विभाग, आजीवन शिक्षण व विस्तार विभाग आणि सांस्कृतिक विभाग, मराठी विभाग व इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. यावेळी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर, उपप्राचार्य डॉ. विष्णु जायभाये, डॉ. अशोक साळुंखे, डॉ. मुकेश कदम, प्रा. हनुमंत सुतार, एन. एस. एस. कार्यक्रमाधिकारी प्रा. संदीप निर्वाण, डॉ. महेश कुलकर्णी, डॉ. सूरज बुलाखे आदी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक डॉ. संगीता घाडगे यांनी केले. यानिमित्त रांगोळी, मेहंदी, एकपात्री प्रयोग, एकांकिका, इंग्रजी व मराठी हस्ताक्षर, वादविवाद, प्रहसन, नक्कल, वक्तृत्व स्पर्धा, पोस्टर प्रदर्शन, व्याख्यान, गीतगायन स्पर्धा आयोजित केल्या होत्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:35 AM 10/Dec/2025