Supriya Sule : सुप्रिया सुळेंनी लोकसभेत व्यक्त केला संताप; भाजपावर टीका करताना निलेश राणेंचं केलं कौतुक

Supriya Sule Speech in Loksabha: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने सध्या राजधानी दिल्लीतलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्यामुळे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी संसदेच्या दोन्ही सभागृहांत पाहायला मिळत आहेत.

लोकसभेत निवडणूक प्रक्रियेतील सुधारणेच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा घेण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी परखड शब्दांत त्यांची भूमिका मांडली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांदरम्यान पैसे वाटपाचे गैरप्रकार झाल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या पक्षफुटीचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.

निवडणूक आयोग काय करत होता? – सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळेंनी महाराष्ट्रात आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्यामुळे अनेक नगरपरिषद व नगरपंचायतीमधील निवडणुका पुढे ढकलल्या गेल्याचा मुद्दा यावेळी उपस्थित केला. ‘आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आला. आरक्षणाच्या बाबतीत आम्ही सरकारसोबत आहोत. पण महाराष्ट्रात निवडणुका जाहीर झाल्यानंतर आरक्षणावर आक्षेप घेतला गेला. निम्म्या ठिकाणी निवडणुका रद्द झाल्या. २४२ नगरपरिषदांपैकी ५७ ठिकाणी आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली होती. काय करत होतं निवडणूक आयोग?’ असा सवाल त्यांनी केला.

लोकसभेत विधानसभा अध्यक्षांवर टीका !

दरम्यान, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षफुटीवरून सुप्रिया सुळेंनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर आगपाखड केली. ‘महाराष्ट्रात एका पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्षच बदलला. पक्षाच्या घटनेचा तिथे उपयोगच उरला नाही. पक्षाची घटना सांगते की पक्ष ठरवतो काय करायचं. पण कुणालाही न विचारता विधानसभा अध्यक्षांनी पक्षाच्या ज्या अध्यक्षांनी पक्ष स्थापन केला, त्यांनाच हटवण्याची परवानगी दिली. फक्त राष्ट्रवादी नाही, पण शिवसेनेच्या बाबतीतही हेच घडलं’, असं त्या म्हणाल्या.

‘भाजपा एवढं सांगतं की काँग्रेसनं अमुक सरकार पाडलं वगैरे. पण तुम्ही त्यापेक्षा जास्त केलं. हे लोकशाहीला धरून कसं आहे? जर तुम्हाला पक्ष तोडायचाय, हरकत नाही, नवा पक्ष काढा. मला तर पक्षाचं चिन्हही मिळालं नसतं. आम्हाला कोर्टात जावं लागलं. जर मी कोर्टात गेले नसते, तर आज लोकसभा निवडणूक जिंकून इथे खासदार होऊन आलेही नसते’, असंही सुप्रिया सुळेंनी नमूद केलं.

निलेश राणेंचं केलं कौतुक

सुप्रिया सुळेंनी आपल्या भाषणात मालवणात पैसे वाटले जात असल्याचा आरोप करत व्हिडीओ पुरावे देणाऱ्या निलेश राणेंचं कौतुक केलं. ‘याच सभागृहात नोटबंदीचं विधेयक पारित केलं गेलं. संपूर्ण देश कॅशलेस होईल असं पंतप्रधान म्हणाले होते. इतर कुणाकडे नाही, पण भाजपाच्या लोकांकडे कॅश कुठून आली? थोडीफार नाही, मोठ्या बॅगांमध्ये सापडली आहे. त्याचे व्हिडीओ बाहेर आलेत. मी मागणी करते की याची ईडी-सीबीआय चौकशी करावी. जर एवढी कॅश छापली जात नसेल, तर एवढी कॅश महाराष्ट्रात आली कुठून? या खोट्या नोटा आहेत की नेपाळमधून आलेल्या नोटा आहेत माहिती नाही. हे एक मोठं रॅकेट चाललं आहे’, असं त्या म्हणाल्या.

‘मी ऑन रेकॉर्ड सांगते की निलेश राणेंनी जे केलं त्याचं मी स्वागत करते. निलेश राणे हे देशभक्तीचं उदाहरण आहे. ते सत्तापक्षात आहेत, पण देशासाठी त्यांनी रोख रक्कम पकडली. कॅमेरे घेऊन गेले आणि सगळ्यांना दाखवलं तिथे काय घडत होतं’, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:00 PM 10/Dec/2025