चिपळूण: खांडोत्री वळणावर भरधाव दुचाकीची टेम्पोला धडक; ‘राँग साईड’ने येणे पडले महागात, तरुण गंभीर जखमी

सावर्डे | प्रतिनिधी : चिपळूण तालुक्यातील खांडोत्री येथील गांगण पोल्ट्री जवळील अवघड वळणावर भरधाव वेगातील दुचाकीने समोरून येणाऱ्या टेम्पोला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला असून, चुकीच्या दिशेने वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी त्याच्यावरच सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा अपघात सोमवार, दिनांक ०९ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४:३० वाजण्याच्या सुमारास घडला.

नेमकी घटना काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी औदत सोमा भागडे (वय ३१, रा. आंबिटगाव, गावकरवाडी, सावर्डे) हे व्यवसायाने ड्रायव्हर आहेत. ते आपल्या ताब्यातील टाटा कंपनीचा ७०९ टेम्पो (क्रमांक एमएच ०७-४३८६) घेऊन पाते पिलवली ते आंबीटगाव असा प्रवास करत होते.

सायंकाळी ४:३० च्या सुमारास त्यांचा टेम्पो खांडोत्री येथील गांगण यांच्या पोल्ट्री जवळील वळणावर आला असता, समोरून उदय शैलेश पटेल (रा. आंबलोली, ता. गुहागर) हा आपली दुचाकी (क्रमांक एम.एच ०८-ए.एस-४०५९) घेऊन आला. रस्ता वळणाचा असतानाही उदय पटेल याने आपल्या ताब्यातील दुचाकी भरधाव वेगाने आणि चुकीच्या दिशेला (उजव्या बाजूला) नेली. यामुळे दुचाकीची समोरून येणाऱ्या टेम्पोला जोरात धडक बसली.

स्वतःच्याच दुखापतीस कारणीभूत या धडकेत दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून चालक उदय पटेल याला गंभीर दुखापत झाली आहे. निष्काळजीपणे आणि अरावीपणे गाडी चालवून अपघातास निमंत्रण दिल्याप्रकरणी फिर्यादी औदत भागडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सावर्डे पोलिसांनी दुचाकी स्वार उदय पटेल याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १२४/२०२५ अन्वये भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:57 AM 11/Dec/2025