Chandrashekhar Bawankule : महानगरपालिकांसह जिल्हा परिषदांच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? बावनकुळेंनी केलं मोठं विधान

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. नगरपरिषद, नगरपंचायतींच्या निवडणुका झाल्या असल्यातरी निकाल अद्याप बाकी आहे. असे असताना आता जिल्हा परिषदा आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये महायुतीची एकजूट कायम राहणार असून, आम्ही 51 टक्के मतांचा आकडा गाठून विजय मिळवण्याचे ध्येय ठेवले असून, या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, अशी महत्वपूर्ण घोषणा राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, जिल्हा पातळीवरील सर्व नेत्यांना स्थानिक स्तरावर महायुतीची बांधणी पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेसाठी देखील महायुती सज्ज झाली आहे. शिवसेनेने ९० ते १०० जागांची मागणी केली असली तरी, जागावाटपाचा निर्णय तांत्रिक बाबी तपासून घेतला जाईल.

यासाठी भाजपचे आणि शिवसेनेचे प्रत्येकी चार पदाधिकारी तसेच महायुतीचे प्रतिनिधी यांची समिती एकत्र बसून चर्चा करेल. जिथे मतभेद होतील, तिथे वरिष्ठ नेते तोडगा काढतील, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. तसेच, मुंबईच्या महापौरपदाचा निर्णय फडणवीस, शिंदे आणि अजित पवार हे तिघे मिळून घेतील.

अजित पवार महायुतीचा अविभाज्य भाग

अजित पवार हे महायुतीचाच अविभाज्य भाग असून ते आगामी लढाही सोबतच देणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मागील निवडणुकांमध्ये काही ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये मतभेद झाले होते, मात्र ते आता पूर्णपणे दूर झाले आहेत. आमच्यात ‘मनभेद’ नव्हते, केवळ निवडणूकनिहाय ‘मतभेद’ होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसने विदर्भाकडे दुर्लक्ष केल्यानेच त्यांचे पतन

वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर आणि विकासावर बोलताना बावनकुळे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर विदर्भाचा झपाट्याने विकास झाला आहे. छोटे राज्य विकसित होऊ शकतात, यावर भाजपचा विश्वास असून विदर्भाला पूर्ण न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. काँग्रेसने विदर्भाकडे दुर्लक्ष केल्यानेच त्यांचे या भागात पतन झाले आहे. विदर्भात सर्वाधिक जंगल असल्याने वन विभागाचे मुख्यालय (फॉरेस्ट कार्यालय) मुंबईत हलवले जाणार नाही, असे स्पष्टीकरण बावनकुळे यांनी दिले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:24 PM 11/Dec/2025