दापोली : सध्या धावत्या जगामध्ये निसर्ग संवर्धन हा कळीचा मुद्दा झाला असताना आणि सर्वत्र वृक्ष कटाई आणि प्रदूषणाची स्पर्धा दुर्दैवाने सुरू असताना रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात मात्र एक नवा आशेचा किरण फुलला आहे. आणि त्यामुळे कोकणच्या आणि दापोलीच्या पर्यटनाला एक नवा आयाम प्राप्त झाला आहे. दापोली तालुक्यातील जालगाव येथे निवेदिता प्रतिष्ठान आणि आम्रपाली होम स्टे च्या माध्यमातून शाळा आणि महाविद्यालयांकरिता “बिन भिंतीची शाळा” असा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. याबाबत माहिती देताना प्रकल्प प्रमुख डॉ. प्रशांत परांजपे यांनी सांगितलं, की आज पर्यावरण विषय हा गुणांपुरता दुर्दैवाने मर्यादित राहिल्यामुळे आणि पालकांपर्यंत त्याची जाणीव जागृती न झाल्यामुळे निसर्गाचा प्रचंड प्रमाणात न्हास होत चालला आहे. तो टाळून सत्यस्थिती मध्ये निसर्ग रक्षण किती महत्त्वाचे आहे आणि सद्यस्थिती किती गंभीर आहे याची जाणीव जागृती करून देण्यासाठी या निसर्ग शाळेचे अर्थात बिन भिंतीच्या शाळेचे आयोजन करण्यात आलं आहे.
या शाळेमध्ये विविध महाविद्यालयाने शाळांचे आजपर्यंत हजारो विद्यार्थी निसर्गाची तोंड ओळख करून गेले आहेत. त्याचप्रमाणे बिन भिंतीच्या शाळेमध्ये अनेक निसर्गप्रमी देखील येऊन निसर्गानंद घेऊन जात असतात. या शाळेमध्ये निसर्ग वाचायला शिकवला जातो. परिसरात असलेल्या वनस्पतींचे वनौषधी उपयोग आणि गमती जमती सांगून वृक्षवल्ली बाबतची आत्मियता वाढविली जाते. तसेच कचरा किती सुंदर आहे हे प्रात्यक्षिकातून दाखवतानाच, कचऱ्यावर बसून आपण जेवण घेत आहोत हे सांगितल्यावर इथे आलेल्या प्रत्येकाला अचंबित व्हायला होते. कारण या ठिकाणी कचऱ्यापासून केबिन बनवण्यात आली आहे, कचऱ्यापासून बॅचेस बनवण्यात आले आहेत, कचऱ्यावर आधारितच मचाण शेतीचा प्रकल्प आहे आणि त्याच प्रमाणे “दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं” या म्हणी चा प्रत्यय दिला जातो. यातून आपण कसे फसतो आहोत आणि कॅन्सर सारखे महाभयंकर आजार कसे आपण विकत घेऊन ते खातो आहोत ते प्रात्यक्षिकांसह दाखवून समाजाचे डोळे उघडण्याचे मोठ काम या माध्यमातून केलं जात आहे.
त्याचप्रमाणे शेकोटीच्या गप्पा, पोपटी पार्टी आणि कोणतेही साधन सामग्री न घेता एकाच वेळेला ५० ते १०० विद्यार्थी किंवा आलेल्या समूहातील नागरिकांना सामावून घेऊन नैसर्गिक खेळातून निसर्गानंद आणि धमाल मस्तीचा आनंद दिला जातो. टाळी योगातून एनर्जी दिली जाते.
या संपूर्ण एक दिवस किंवा दोन दिवसाच्या निसर्गानंद आणि बिन भिंतीच्या शाळेचे आयोजन हे अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने केलं जाते. त्यामध्ये विविध विषयाचे तज्ञ हे मार्गदर्शक म्हणून लाभतात आणि ते मुलांचे होऊन जातात. कोकणातील 50 ते दीडशे वर्षे पूर्वीच्या पुराण वस्तू ंचा परिचय करून देऊन इतिहास किती प्रगल्भ होता याची जाणीव जागृती करून देण्यात येते. त्याचप्रमाणे दापोली ते दिलेल्या महान रत्नांची ओळख या निसर्ग शाळेत एकाच प्रकल्पात करून देण्यात येते. निसर्ग वाचायला शिकला तरच निसर्ग वाचणार म्हणूनच ही बिन भिंतीची शाळा दापोली येथील जालगाव मध्ये भरते आहे . याचा आनंद जास्तीत जास्त नागरिकांनी महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांनी घ्यावा आणि निसर्गसंवर्धनात प्रत्येकाने मोलाचा वाटा उचलावा असे आवाहन निसर्ग संवर्धनार्थ करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9561142078 या क्रमांकावर संपर्क करावा
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:59 PM 11/Dec/2025














