संगमेश्वर ते बुरंबी मार्गावर खड्डे; दुचाकी घसरून तरुणी जखमी

देवरुख : संगमेश्वर-देवरुख मार्गावरील पाऊस थांबल्यानंतरही संगमेश्वर ते बुरंबी या मार्गावरील भयावह खड्डे भरण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे सातत्याने अपघात होत असून, बुधवारी सकाळी साडेआठ वाजता मयूरबाग येथील मंगल कार्यालयासमोर एक दुचाकी खड्ड्यात आदळून अपघात झाला. या अपघातात मागे बसलेली तरुणी गंभीर जखमी झाली आहे.

संगमेश्वर ते बुरंबी या दरम्यान रस्त्याचा भाग शिल्लकच नसून वाहने गेल्यानंतर सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरत आहे. या मार्गाच्या दुतर्फा राहणाऱ्या ग्रामस्थांच्या घरात दररोज धुळीचे लोट येऊन वृद्ध माणसांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. संगमेश्वर ते बुरंबी हा मार्ग सध्या चर्चेचा विषय बनला आहे. साडवली येथे २ डिसेंबर रोजी खड्डे भरण्याचे काम थांबविण्यात आले आणि तेथून ही यंत्रणा अन्यत्र गेली. खड्डे भरण्याचे हे काम अचानक का थांबवले, हे मात्र गुलदस्त्यात आहे.

खड्ड्यांमुळे मयूरबाग येथे दुचाकीचा अपघात होऊन तरुणी गंभीर जखमी झाली. या अपघातानंतर एका कारचालकाने तरुणीला तातडीने दवाखान्यात दाखल केल्याने जखमी तरुणीचे नाव समजू शकले नाही.

रस्त्याच्या बाजूला विजेचे खांब
संगमेश्वर ते लोवले दरम्यान महावितरणच्या ठेकेदाराने रस्त्याच्या साईड पट्टीवर सिमेंटचे खांब उतरवून ठेवले आहेत. ही बाब लक्षात आणून दिल्यानंतरही अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. याठिकाणीही गंभीर अपघात होण्याची भीती आहे.

दिलेले आश्वासन हवेतच
संगमेश्वर-साखरपा मार्गाच्या दुरवस्थेबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर देवरुख सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे भरण्याचे काम साखरप्यापासून देवरुखपर्यंत पूर्ण केल्याचा दावा केला होता. संगमेश्वर ते बुरंबी या मार्गावरील जीवघेणे खड्डे आठ दिवसांत भरले जातील, असे आश्वासनही दिले होते. मात्र, खड्डे भरण्याचे काम साडवली येथेच थांबले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:35 PM 11/Dec/2025