लांजा : तालुक्यातील लांजा-देवधे-आसगे-दाभोळे मार्गावरील गेल्या सहा महिन्यांपासून बंद झालेली अवजड वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. ही अवजड वाहतूक शालेय विद्यार्थी, नागरिक व हलक्या वाहनचालकांना धोकादायक ठरत आहे. याविरोधात देवघेमधील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ही चिरे वाहतूक त्वरित बंद करावी, अशी मागणी देवधे ग्रामस्थांनी केली आहे.
तालुक्यातील सापुचेतळे, गवाणे, कोट परिसरात मोठ्या प्रमाणात चिरेखाणी असून येथील जांभा चिरा कोल्हापूर, सांगली या जिल्ह्याबरोबर कर्नाटकपर्यंत वाहतूक केला जात आहे. लांजातून मोठ्या प्रमाणत दिवसा व रात्री चिरे वाहतूक वाढली आहे. यामधून तालुका प्रशासनालाही महसूल प्राप्त होत आहे. असे असले तरी वाढलेली चिरेवाहू अवजड ग्रामीण रस्त्यांना त्रासदायक ठरत आहे.
काही महिन्यापूर्वी तळवडे येथे दोन ते तीनवेळा चिरेवाहू अवजड वाहनांना अपघात होऊन चालकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर देवधे मार्गे सुरू असणारी वाहतूक काही महिने बंद होती. मात्र, पुन्हा एकदा अवजड वाहतूक सुरू झाली आहे. दिवसा व रात्री-मध्यरात्री चिरेवाहू अवजड ट्रक बेदरकारपणे चालवत आहेत. मोठ्या वाहनांमुळे समोरून येणाऱ्या वाहनांना बाजू देताना धोकादायक ठरत आहे. चिरेवाहू वाहतूक अन्य मार्गे वाळवावी अशी मागणी देवधे ग्रामस्थांमधून जोर धरू लागली आहे. बंद झालेली वाहतूक पुन्हा का करण्यात आली, असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:42 AM 12/Dec/2025












