‘सामंत साहेब, आता तुम्हीच लक्ष घाला!’; रत्नागिरीचा मान हिरावला जाणार? ६४ व्या राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी अमरावतीला हलवण्याच्या हालचाली

रत्नागिरी : गेल्या ६४ वर्षांत पहिल्यांदाच रत्नागिरीकरांना जी सांस्कृतिक मेजवानी मिळणार होती, त्यावर आता राजकीय मळभ दाटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रत्नागिरीत नियोजित असलेली ६४ वी मराठी हौशी नाट्य स्पर्धेची (Marathi Houshi Natya Spardha) अंतिम फेरी राजकीय दबावापोटी अमरावतीला हलवली जाण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, “सामंत साहेब, आता तुम्हीच लक्ष घाला आणि ही स्पर्धा इथेच होईल हे पहा,” अशी आर्त साद रत्नागिरीतील नाट्यप्रेमींनी राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांना घातली आहे.

काय आहे प्रकरण?

सुमारे ६४ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी रत्नागिरीत होणार हे निश्चित मानले जात होते. यासाठी शासनाने रत्नागिरीतील नाट्यगृह (Natya Griha) देखील बुक केले आहे. मात्र, ऐनवेळी अमरावतीचे आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्यासह नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती नियामक मंडळाचे सदस्य ॲड. प्रशांत देशपांडे आणि अमरावती नाट्य परिषद अध्यक्ष ॲड. चंद्रशेखर डोरले यांनी जोरदार लॉबिंग सुरू केले आहे. या शिष्टमंडळाने नुकतेच विधिमंडळ अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांची भेट घेतली. ही अंतिम फेरी अमरावती येथे भरवण्यात यावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे केवळ राजकीय वजन वापरून ही स्पर्धा रत्नागिरीतून अमरावतीला पळवली जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

उदय सामंत यांच्याकडे नजरा

रत्नागिरीचे सुपुत्र आणि पालकमंत्री उदय सामंत हे स्वतः अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे (Akhil Bharatiya Marathi Natya Parishad) विश्वस्त आहेत, तसेच राज्याचे मराठी भाषा मंत्री देखील आहेत. त्यामुळे त्यांच्या जिल्ह्यात येणारा हा बहुमान टीकावा, ही त्यांची नैतिक जबाबदारी असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. सामंत यांनी आपली ताकद पणाला लावून ही स्पर्धा रत्नागिरीतच होईल याची खात्री करावी, अशी मागणी होत आहे.

नाट्यरसिकांची पर्वणी हुकणार?

संपूर्ण महाराष्ट्रातून निवडक ५२ नाटके अंतिम फेरीत धडकली आहेत. ही सर्वोत्कृष्ट नाटके पाहण्याची सुवर्णसंधी रत्नागिरीकरांना मिळणार होती. मात्र, जर ही स्पर्धा स्थलांतरित झाली, तर कोकणातील नाट्यचळवळीचा आणि रसिक प्रेक्षकांचा हा हिरमोड ठरेल.