पाचल : परप्रांतीय फेरीवाल्यांना प्रवेश बंदी करण्याचा त्याचबरोबर मोकाट जनावरे सोडणाऱ्या मालकावर दंडात्मक कारवाई करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव तळवडे ग्रामपंचायतीच्या सरपंच गायत्री साळवी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत करण्यात आला.
ग्रामविकास अधिकारी मंगेश जाधव यांनी स्वागत करुन इतिवृत्त वाचन केले यानंतर विकास कामावर चर्चा होऊन कामांचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील तळवडे हे मधाचे गाव म्हणून जाहीर झाले असून याबाबत सरपंच गायत्री साळवी यांनी ग्रामस्थांना माहिती दिली.
जल जीवन योजनेतंर्गत कामाचा आढावा घेण्यात आला व ही कामे अधिक जलदगतीने करण्याचे ठरले. सध्या परिसरात तसेच तालुक्यात चो-या, दरोडे, खून अशा घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. त्यामुळे गावात येणारे परप्रांतीय फरीवाले यांना गावात येण्याची प्रवेश बंदी करण्याचा ठराव तसेच मोकाट जनावरे सोडणाऱ्या मालकांवर दंडात्मक करण्याचा ठराव ग्रामस्थांनी मांडला. हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
यावेळी माजी सरपंच आत्माराम चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते आप्पा साळवी, संदीप बारसकर, सुनील गुरव, अमित चिले, राजन गुरव, भगवान कोकरे, पत्रकार सुरेश गुडेकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:40 AM 13/Dec/2025














