चिपळुणात हातभट्टीवर धाड; दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

चिपळूण : आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर चिपळूण तालुक्यात लाखोंची हातभट्टीची दारू जप्त करण्यात येत आहे. चिपळूण, सावर्डा व शिरगाव पोलिसांमार्फत ठिकठिकाणी हातभट्टीवर धाडी टाकून ही कारवाई केली जात आहे. यामध्ये लाखोंचा ऐवज जप्त झाला असून अनेकांवर गुन्हेदेखील दाखल करण्यात आले आहेत.

तालुक्यातील वहाळ कोष्टेवाडी येथे एका हातभटटीवर धाड टाकून सावर्डे पोलिसांनी १ लाख १२ हजार रूपयांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही धाड २४ ऑक्टोबर रोजी पोलिस शिपाई सारिका जाधव यांनी टाकली. यामध्ये गावठी हातभट्टीची दारू गाळत असताना एका महिलेला रंगेहात पकडण्यात आले. यामध्ये १ हजार १०० लीटर कुजके रसायन व दारू गाळण्याचे साहित्य असा १ लाख १२ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला.

शिरगाव पोलिस ठाणे अंतर्गत पोलिसांनी केलेल्या कारवाईत एकाकडे विनापरवाना एक हजार रूपयांची हातभट्टीची दारू आढळून आली आहे. या प्रकरणी सीताराम शिर्के (रा. पोफळी शिर्केवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तालुक्यातील नारदखेरकी येथे हातभट्टीची दारू गाळत असताना चिपळूण पोलिसांनी एकाला रंगेहाथ पकडले आहे. प्रसाद अनंत हळदणकर असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून 86 हजार रूपयांचा ऐवज जप्त केला आहे. अधिक तपास चिपळूण पोलिस करीत आहेत. ही कारवाई चिपळूणचे पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे व सावर्डेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जयंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:12 26-10-2024