Ratnagiri : अवकाळी पावसाने नुकसान; जिल्ह्याला ३ कोटी ६६ लाख ८२ हजार मंजुरी

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात ऐन भात कापणीच्या हंगामात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. कृषी विभागाकडून प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्यानुसार आता ऑक्टोबर महिन्यात झालेल्या भात नाचणी पिकाचे ३ हजार ९५०.२० हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले होते. नुकसानीपोटी रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ३ कोटी ६६ लाख ८२ हजार रुपयास मंजुरी मिळाली आहे. लवकरच २० हजार ८११ शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात यंदा पावसाने दमदार हजेरी लावली. सप्टेंबर महिन्यापर्यंत पावसाने अक्षरशा जिल्ह्याला झोडपून काढले. त्यामुळे भात-नाचणीचे पिके बहरली होती. यंदा भात पिकांचे उत्पादन वाढणार असल्याची शक्यता होती. ऐन भात कापणीच्या हंगामातच सातत्याने पाऊस पडत होता. त्यामुळे कापलेल्या भाताला अंकुर येणे, उभ्या पिकाला अंकुर येणे यासारखे प्रकार घडले. काही ठिकाणी शेतकऱ्यांची भाताची कापणी करूनही त्याचा उपयोग न होता, भात कुजून गेले. ऑक्टोबरच्या अवकाळी, अतिवृष्टीमुळे भात पिकात पाणीच पाणी साचले होते. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेला. त्यामुळे पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत, जिल्हाप्रशासन, कृषी अधिकाऱ्यांनी सर्व ठिकाणी पीक नुकसानाची पाहणी दौरा केला. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी आश्वासन दिले होते. पालकमंत्री उदय सामंत यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ३ कोटी ६६ लाख ८२ हजार रूपये राज्य सरकारने मंजूर केले आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होणार आहे.

कोकण विभागासाठी ऑक्टोबर महिन्यातील नुकसानीसाठी निधी मंजूर झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी ३ कोटी ६६ लाख ८२ हजार रूपये वाटपास मंजुरी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील २० हजार ८११ शेतकऱ्यांचे ३ हजार ९५०.२० हेक्टर क्षेत्रावरी पिकांचे नुकसान झाले आहे. लवकरच या शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम होईल- शिवकुमार सदाफुले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रत्नागिरी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:54 PM 13/Dec/2025