खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या कामाविरोधात जनआक्रोश समितीने चिपळूणनंतर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरातही रविवारी (दि.१४ डिसेंबर) तीव्र आंदोलन केले. शासन, प्रशासन आणि संबंधित ठेकेदारांच्या उदासीनतेविरोधात शहरातून प्रतीकात्मक तिरडी यात्रा काढत जनआक्रोश व्यक्त करण्यात आला.
खेड शहरातील विविध भागांतून ही तिरडी यात्रा काढण्यात आली. महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे झालेले अपघात, निष्पाप नागरिकांचे गेलेले प्राण, वाहतूक कोंडी आणि दैनंदिन त्रास याकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत सरकारचा जाहीर निषेध केला. अखेर या आंदोलनाचा समारोप भरणेनाका येथे मुंबईगोवा राष्ट्रीय महामार्गावर करण्यात आला. गेल्या सुमारे १८ वर्षांपासून महामार्गाचे काम अपूर्ण अवस्थेत असून दरवर्षी नवीन डेडलाईन जाहीर केल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात कामाची गती अत्यंत संथ असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
महामार्गावर अपघातांची मालिका सुरू असून हजारो प्रवाशांना जीव गमवावा लागल्याचा संताप आंदोलकांनी व्यक्त केला.या आंदोलनाच्या माध्यमातून जनआक्रोश समितीने विविध मागण्यांचे निवेदन शासनाकडे सादर केले. त्यामध्ये मुंबई गोवा महामार्गाच्या कामाचे तटस्थ, पारदर्शक व प्रभावी परीक्षण करण्यासाठी स्वतंत्र उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी, या समितीत जनआक्रोश समितीच्या चार सदस्यांचा समावेश असावा, अपूर्ण काम, विलंब आणि निष्काळजीपणासाठी जबाबदार अधिकारी व ठेकेदारांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच महामार्ग पूर्णत्वासाठी स्पष्ट व अंतिम मुदत जाहीर करून तिचे काटेकोर पालन करण्यात यावे, अशा प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.
महामार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात जिल्हाभरात तीव्र असंतोष असून, शासनाने तातडीने दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही जनआक्रोश समितीने दिला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:38 AM 15/Dec/2025










