Accident | खेडशी येथे दुचाकीची रिक्षा टेम्पोला धडक बसून स्वाराचा मृत्यू

रत्नागिरी : शहरानजीकच्या खेडशी महालक्ष्मी मंदिराजवळ राधाकृष्ण ग्रेनाईट दुकानासमोर शनिवार, दि. १३ डिसेंबर रोजी रात्री ९.३० वा. सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या अॅक्सेस दुचाकीने रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षा टेम्पोला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात दुचाकी चालक राज सुधाकर कोत्रे (वय १९, रा. कापडगाव, रत्नागिरी) याचा जागीच मृत्यू झाला.

त्याच्यासोबत असलेले आर्यन विनोद कुरतडकर (१९) आणि पार्थ विजय कुरतडकर (१९, दोन्ही रा. कापडगाव, रत्नागिरी) हे दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे तिघेही शनिवारी रात्री दुचाकीवरून चालले होते. त्याच सुमारास निवळी येथून रत्नागिरीच्या दिशेने जाणारा रिक्षा टेम्पो (एमएच -०८- बी.सी. १२७९) रात्री खेडशी महालक्ष्मी मंदिराजवळून जात असताना समोरून येणाऱ्या अॅक्सेस दुचाकीने (एमएच ०८-एडब्ल्यू १६६२) त्या रिक्षा टेम्पोला जोरदार धडक दिली. ही घडक इतकी जोराची होती की, त्यामुळे दुचाकीवरील तिघेही रस्त्यावर कोसळले. यात राज कोत्रे याचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. या अपघाताची नोंद ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:43 AM 15/Dec/2025