खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कोकणात, विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातील कशेडी बोगदा परिसरात पावसाळ्यात दरवर्षी होणाऱ्या भूस्खलनामुळे महामार्गावरील वाहतूक बाधित होण्याच्या घटना वारंवार घडत होत्या. या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या निर्देशानुसार भूस्खलन रोखण्यासाठी ठोस व दीर्घकालीन उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.
केंद्र शासनाची नामांकित संस्था असलेल्या उत्तराखंड येथील तेहरी हायड्रो इलेक्ट्रिक डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मार्फत कशेडी बोगदा परिसरातील डोंगर उतारांवर रॉक बोल्टिंग तसेच तारेची संरक्षक जाळी बसविण्याचे काम सध्या वेगात सुरू आहे. या उपायांमुळे डोंगरकड्यांतील सैल खडक व माती स्थिर राहून दरड कोसळण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
गेल्या वर्षी कशेडी बोगद्याच्या सुरुवातीच्या भागात मोठ्या प्रमाणात भूस्खलन होऊन महामार्गावरील एक लेन अनेक तास बंद राहिली होती. तसेच रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीतील दोन वेगवेगळ्या ठिकाणी दरड कोसळून वाहतूक विस्कळीत झाली होती. या घटनांचा गांभीर्याने विचार करून त्या दोन्ही ठिकाणीही रॉक बोल्टिंग व तारेची जाळी बसविण्याचे भूस्खलन प्रतिबंधक काम हाती घेण्यात आले आहे.
खेड तालुक्यातील कशेडी बोगद्याच्या समोरील महामार्गालगत असलेल्या डोंगराळ भागात हे काम युद्धपातळीवर सुरू असून येत्या पावसाळ्यात दरड कोसळण्याचा धोका निर्माण होणार नाही, असा विश्वास राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने व्यक्त केला आहे. या उपाययोजनांमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक अधिक सुरळीत राहणार असून पावसाळ्यात तासन्तास चालणाऱ्या वाहतूक कोंडीतून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:28 AM 15/Dec/2025










