Shekhar Nikam | कोकणच्या जलसंधारणासाठी विशेष पॅकेज द्या : आमदार शेखर निकम

चिपळूण : विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशन दरम्यान कोकणातील जलसंधारण विषयावर सभागृहात सखोल आणि वस्तुनिष्ठ चर्चा झाली. आमदार नीलेश राणे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर आमदार शेखर निकम यांनी कोकणच्या भौगोलिक व सामाजिक परिस्थितीचा सन्मान राखत आपली भूमिका मांडली.

कोकणात मोठ्या धरणांना मर्यादा असल्या तरी लघुपाटबंधारे आणि लघु जलसंधारण प्रकल्प हे कोकणासाठी उपयुक्त आणि शाश्वत पर्याय असल्याचे आमदार निकम यांनी अधोरेखित केले. मात्र निधीअभावी अनेक मंजूर प्रकल्प रखडले असल्याने शेतकरी आणि ग्रामीण भागाला अपेक्षित लाभ मिळत नसल्याची बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. महाराष्ट्र राज्याचा विचार करता लघुपाट बंधाऱ्यांच्या बहुतांश संभाव्य ठिकाणी कोकण विभागात आहेत. हे प्रकल्प वेळेत पूर्ण झाले तर कोकण निश्चितच सुजलाम् सुफलाम् होऊ शकते, असे मत आमदार शेखर निकम यांनी व्यक्त केले. याच अनुषंगाने त्यांनी कोकणासाठी स्वतंत्र विशेष जलसंधारण पॅकेज देण्याचा विचार शासन स्तरावर होऊ शकेल का, अशी विनम्र व सकारात्मक मागणी केली.

निधीअभावी मंजूर प्रकल्प रद्द न करता त्यांना आवश्यक आर्थिक पाठबळ देऊन वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच जलसंधारण प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी निश्चित कालमर्यादा व प्रभावी वेळेचे नियोजन महत्त्वाचे असल्याकडेही त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. यावर उत्तर देताना जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी कोकणातील अनेक प्रकल्पांना यापूर्वीच शासनाची मंजुरी दिली असल्याची माहिती दिली.

प्रकल्पांना उशीर होण्यामागे स्थानिक पातळीवरील जमीन संपादन, शेतकऱ्यांच्या हरकती तसेच इतर प्रशासकीय बाबी कारणीभूत ठरल्याचेही त्यांनी सांगितले. संबंधित विभागामार्फत आवश्यक निधीचे नियोजन सुरू असून कोकणातील मंजूर प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे आश्वासन मंत्री महोदयांनी सभागृहात दिले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:40 AM 16/Dec/2025