दापोली : दापोली तालुक्यात चोऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून चोरट्यांनी पुन्हा बुरोंडी परिसरावर लक्ष केंद्रित केल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी बुरोंडी, लाडघर आणि करंजगाव येथे सलग सात ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या असताना, आता आणखी एका चोरीची भर पडली आहे. या सलग घटनांमुळे तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.
बुरोंडी येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्याचे दागिने लंपास केले, तर फणसू गावातील देवळातील घंटा चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे. देवस्थानांनाही चोरट्यांनी लक्ष्य केल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना आहे.
मागील वर्षभरात दापोली तालुक्यात तब्बल १५ ते २० ठिकाणी धाडसी चोरीच्या घटना घडल्याची नोंद आहे. घरांमधील मौल्यवान दागिने तसेच देवळांमधील साहित्य चोरीस गेल्याने एकूण नुकसान कोट्यवधी रुपयांच्या आसपास असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर अनेक नागरिकांनी काळ्या रंगाच्या ‘एक्सेस १२५ सीसी’ दुचाकीवर हेल्मेट घातलेले दोन तरुण संशयास्पदरीत्या परिसरात फिरताना दिसल्याचे सांगितले आहे. मात्र, वारंवार घडणाऱ्या या घटनांनंतरही पोलिसांना अद्याप ठोस धागेदोरे हाती लागलेले नाहीत. त्यामुळे चोरट्यांचे जाळे सक्रिय असून, पोलिस तपास यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
चोरीच्या वाढत्या घटनांमुळे ग्रामीण भागात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून नागरिकांकडून रात्रीची गस्त वाढवणे, सीसीटीव्ही यंत्रणा बसवणे आणि तपासाला गती देण्याची जोरदार मागणी होत आहे. पोलिस प्रशासनाने लवकरात लवकर चोरट्यांचा छडा लावून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:50 AM 16/Dec/2025














