दापोली : दापोली एसटी आगारातील दिसाळ कारभाराचा प्रत्यय दररोज येत असून, हे आगार आता जणू खासगी चारचाकी वाहनांचा मोकळा वाहनतळ बनल्याचे चित्र आहे. पूर्वीच्या अधिकारी वर्गात प्रचलित असलेली “कंपनीला कुलूप नाही आणि गाडीला चावी नाही” ही म्हण दापोली आगारात तंतोतंत लागू होत असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
दररोज सकाळच्या वेळेत दापोली एसटी डेपोमध्ये जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या खासगी गाड्या तासन तास निर्धास्तपणे उभ्या दिसतात. आगार प्रशासनाकडून कोणतीही अटकावाची कारवाई न झाल्याने, खासगी वाहनधारकांसाठी जणू ‘आओ जावो, घर तुम्हारा’ अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, या मोकळेपणाचा फटका स्थानिक रिक्षा व्यवसायिकांना बसत आहे. एखाद्या वयोवृद्ध प्रवाशाला डेपोमध्ये सोडण्यासाठी आलेल्या रिक्षाचालकांना मात्र नियमांची कडक चाकोरी दाखवली जाते. एकीकडे खासगी चारचाकींना मोकळे रान, तर दुसरीकडे स्थानिक व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा दाखवण्यात येत आहे. या दुहेरी भूमिकेमुळे परिसरातील व्यवसायिक नागरिकांमूधन संताप व्यक्त केला जात आहे.
आगारात लावण्यात येणाऱ्या खासगी वाहनांकडे एसटी प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष असून, एकूणच आगाराचा कारभार ढिम्म असल्याची भावना प्रवासी व नागरिकांमध्ये पसरली आहे. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकाराकडे गांभीयनि लक्ष देऊन, आगारातील शिस्त पुन्हा प्रस्थापित करावी, अशी मागणी होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:30 PM 16/Dec/2025












