Ratnagiri : पावस परिसरात आंबा बागेत फवारणीस प्रारंभ

पावस : यावर्षी सलग सहा महिने सातत्याने पाऊस पडल्यामुळे हापूस आंबा पिकाची स्थिती काय होणार या चिंतेत असतानाच पाऊस थांबल्यानंतर पावस परिसरामध्ये थंडीला सुरुवात झाल्यामुळे आंबा कलम बागेमध्ये फवारणीच्या कामाला जोरदार सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर नेपाली गुरखे येण्यास सुरुवात झाली असून परिसरामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता प्रत्येक आंबा बागायतदाराने आपल्याकडे येणाऱ्या गुरख्यांची नोंद पोलिस स्थानकामध्ये करण्यात यावी असे आवाहन करण्यात आले आहे. यापार्श्वभूमीवर प्रत्येकाने सामाजिक व व्यावसायिक भान ठेवून सहकार्य करावे यासाठी प्रत्येक भागात बागातदारांना आवाहन करण्यात येत आहे.

यावर्षी अवकाळी शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पावसामुळे आंबा बागायतदारही संभ्रमात होता. पुढे आंब्याचे काय होणार अशा मनःस्थितीत असताना पावसाने विश्रांती घेतली आणि थंडीला सुरुवात झाली. थंडीनेसुद्धा चांगल्या प्रकारे गती घेतल्यामुळे आंबा बागायतदारांमध्ये थोडीफार समाधानाची बाब निर्माण झाली. त्यामुळे सतत पडणाऱ्या थंडीमुळे परिसरातील आंबा बागातदारांनी आंबा फवारणीला सुरुवात केली आहे. सध्या वातावरण कमी-जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

त्यामुळे सध्या आंबा फवारणीच्या कामाला वेग आला आहे. अशा स्थितीमध्ये स्थानिक मजूर मिळत नसल्यामुळे नेपाळवरून दरवर्षीप्रमाणे गुरखे मोठ्याप्रमाणात अआंबे राखण्यासाठी येत आहेत, परंतु यांची आंबा बागातदार कोणतीही नोंद ठेवत नसल्यामुळे काही अपघात किंवा काही दुर्घटना घडल्यास पोलिसांना त्याचा शोध घेणे अडचणीचे ठरते. दोन वर्षांपूर्वी एका आंबा बागायतदाराच्या बागेमध्ये दोघा सख्खा भावांना एका दुसऱ्या बागेतील गुरख्याने ठार मारले होते. त्याचा शोध घेणे कठीण बनले होते. याकरिता पूर्णगड सागरी पोलिस ठाण्याच्या वतीने प्रत्येक बागायतदाराने आपल्या बागेत राखण करीत असलेल्या गुरख्यांची संपूर्ण माहिती जमा करावी, असे प्रत्येक गावातील पोलिस पाटलांच्या माध्यमातून व बैठका घेऊन आवाहन करण्यात आले होते; परंतु मागील वर्षी त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. अंतिम टप्प्यात तीनशे ते चारशे गुरख्यांची नोंद झाली. परिसरामध्ये सुमारे ८०० बागायतदारांची नोंद आहे, परंतु त्यातील काही ठराविकच बागातदार गुरख्यांची नोंद करतात. त्यामुळे पोलिसांना परिसरात काम करत असताना तपास यंत्रणेमध्ये अडचणी निर्माण होतात. याकरिता यावर्षी मोहर येण्याच्या पूर्वसंध्येला सर्व आंबा बागायतदारांना आवाहन करण्यात आले आहे; जेणेकरून भविष्यात त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या अडचणी दूर होण्यास व परिसरामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होईल.

यासंदर्भात आंबा बागातदार आशुतोष अभ्यंकर म्हणाले की, यावर्षी उशिरापर्यंत पाऊस असल्यामुळे आंबा बागांची परिस्थिती वेगळी झाली होती. परंतु अचानकपणे थंडीने सुरुवात केल्यामुळे काहीप्रमाणात चांगले वातावरण तयार होत आहे. मात्र बदलत्या वातावरणामुळे विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

आमच्याकडे संघाच्या माध्यमातून बागातदारांची नोंद आहे. त्यांना त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आम्ही आवाहन करत असतो; जेणेकरून स्थानिक मजुरांच्या अडचणीमुळे गुरखे काम करत असल्यामुळे त्यांची माहिती देणे बंधनकारक असल्याचे बागातदारांना सांगितले जात आहे-सुरेंद्र भाडेकर, सचिव, आंबा बागायतदार संघ

पावस परिसरामध्ये आंबा बागा राखण्यासाठी आलेल्या गुरख्यांच्या माध्यमातून अनेक लहान-मोठे गुन्हे अथवा घटना घडत असतात. त्यांची नोंद नसल्यामुळे तपासकार्यामध्ये मोठी अडचण येते. याकरिता गावातील प्रत्येक आंबा बागायतदाराला त्याची नोंद पोलिस स्थानकामध्ये ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आवाहन करण्यात आले आहे. आंबा बागातदारांनी चांगला प्रतिसाद दिल्यास पोलिसांना तपास यंत्रणेत अडचण भासणार नाही आणि परिसरामध्ये शांतता व सुव्यवस्था राखली जाईल- सुधीर वाळिंबे, पोलिस पाटील, नाखरे

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:15 PM 16/Dec/2025