रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा गावाजवळील आरटीओ कॅम्पसमोर रिक्षा व ट्रकच्या धडकेत झालेल्या अपघातात तिघेजण जखमी झाल्याची घटना सोमवारी १५ डिसेंबर रोजी सकाळी 12 वा. सुमारास घडली. या अपघातामुळे हातखंबा-पाली मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
पालीकडून रत्नागिरीच्या दिशेने जाणारी रिक्षा (MH 08 BC 1219) यांना मागून येणाऱ्या ट्रकने (MH 08 AP 0711) जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका तीव्र होता की रिक्षा रस्त्यातच पलटी झाली. या अपघातात रिक्षाचालकासह दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले. तिथेच कॅम्पमध्ये असणारे आर टी ओ विभागाच्या पोलिसांनी देखील मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांसह स्थानिक नागरिकांनी जखमींना तातडीने हातखंबा येथील जगदगुरू नरेंद्र महाराज नाणीज धामच्या रुग्णवाहिकेमार्फत रत्नागिरी जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.
जखमींमध्ये चंद्रकांत रामचंद्र कांबळे (५०), मानसी चंद्रकांत कांबळे (४६) व नितेश गंगाराम कांबळे (४०), तिघेही राहणार मुक्काम पोस्ट अडवली, हसाळ बौद्धवाडी, तालुका लांजा येथील आहेत. सध्या तिघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, हातखंबा ते पाली या महामार्गावरील अपघातांची मालिका अद्याप थांबलेली नसून, वेगमर्यादा, वाहतूक शिस्त व सुरक्षिततेबाबत उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:21 PM 16/Dec/2025












