खेड : रेल्वे स्टेशन ते खेड शहरात जाणारा भोस्ते मार्गे रस्ता सध्या पूर्णपणे नादुरुस्त झाला असून या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर खेळ शहरातील सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाला प्रत्यक्ष भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांकडे या रस्त्याची दुरवस्था का झाली आहे, तसेच मंजूर निधी असूनही रस्ता का तयार केला जात नाही, याची सविस्तर विचारपूस केली.
या भेटीदरम्यान अधिकाऱ्यांनी खेड रेल्वे स्टेशन ते बोरज वाया अलसुरे मार्गे जाणाऱ्या रस्त्यासाठी दहा लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती दिली. मात्र सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे यांनी स्पष्टपणे आरोप केला की हा निधी प्रत्यक्षात रेल्वे स्टेशन ते भोस्ते या अत्यंत खराब झालेल्या मार्गावर खर्च होणे अपेक्षित होते. असे असताना खेळ रेल्वे स्टेशनपासून रस्त्याची कामे सुरू न करता जश नाईक मोहल्ला येथून पुढील रस्त्यावर हा निधी वापरला जात असल्याने नागरिकांची फसवणूक होत आहे.
या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नागरिकांनी दोन ते तीन वेळा उपोषण करूनही त्यांच्या मागण्या मान्य होत नसल्याचे मंगेश मोरे यांनी सांगितले. पुढे बोलताना त्यांनी जुलै-ऑगस्ट महिन्यात देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई जिल्ह्यात आले असताना या रस्त्याची दुरुस्ती करण्याचे आदेशच न्यायदेवतेने दिल्याचे नमूद केले. प्रत्यक्षात जिल्हा परिषदेला न्यायालयातूनही हा रस्ता दुरुस्त करण्याबाबत नोटीस देण्यात आलेली असल्याने या रस्त्याची अवस्था किती गंभीर आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सरन्यायाधीश मंडणगड येथे आले असताना या रस्त्यावर केवळ तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती. ही डागडुजी सिमेंट काँक्रीटने न करता जांबा दगडाचे तुकडे वापरून करण्यात आल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे या कामासाठी तब्बल अडीच ते तीन लाख रुपयांचा खर्च जिल्हा परिषदेने दाखविल्याची खळबळजनक माहिती चर्चेत आहे. इतका खर्च करून भरलेले खड्डे अवघ्या दहा दिवसांत पुन्हा उखडून पडल्याने कामाच्या दर्जावरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे ठाम मागणी केली आहे की मंजूर झालेल्या दहा लाख रुपयांच्या निधीतून रेल्वे स्टेशन ते भोस्ते हा रस्ता तातडीने व दर्जेदार पद्धतीने तयार करून द्यावा, जेणेकरून नागरिकांना होणारा त्रास थांबेल आणि भविष्यात अशा निकृष्ट कामांची पुनरावृत्ती होणार नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:42 PM 16/Dec/2025












