Guhagar Beach | गुहागर समुद्रकिनारी भव्य वाळूशिल्प प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

गुहागर : येथील समुद्रकिनारी आयोजित वाळू शिल्प प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. नगरपंचायतीचे मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून, तर ब्लू फ्लॅग मानांकन पायलट प्रकल्प सहायक दीपक विचारे यांच्या हस्ते फीत कापून वाळू शिल्प प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

वाळू शिल्प प्रदर्शनामध्ये अष्टवणे श्री गणेश मंदिरची प्रतिकृती, भगवान महादेव यांची प्रतिकृती, गुहागरचे डॉल्फिन प्रदर्शन, कोकण संस्कृती आदी शिल्प कलाकृती पहावयास मिळत आहेत. यावेळी ब्लू फ्लॅग मानांकन पायलट प्रकल्प सहायक दीपक विचारे, नरेश पेडणेकर म्हणाले, ब्लू फ्लॅग मानांकनासाठी गुहागर हे सर्वोत्तम निवडीचे ठिकाण असल्यामुळे या पर्यटनातून सर्वांचा विकास होणार आहे. दर पंधरा दिवसांनी येथील समुद्राचे पाणी तसेच हवेची प्रदूषण नियंत्रक मंडळ तपासणी करीत आहे.

तहसीलदार परीक्षित पाटील, मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण म्हणाले, गुहागर समुद्रकिनाऱ्यावर कोणीही उघड्यावर प्लास्टिक अथवा कचरा टाकू नये व टाकल्यास कडक निर्बंध यापुढे लावले जाणार आहेत. आपण सर्वांनी मिळून एकत्र येऊन हे ब्लू फ्लॅग मानांकनाच्या पायलट प्रकल्पाला अंतिम मंजुरीपर्यंत नेण्याकरिता सहकार्य करावे. मार्च व एप्रिलमध्ये प्रकल्पाची डेन्मार्कच्या कमिटीकडून तपासणी होणार आहे. यानिमित्त गुहागर समुद्रकिनारी भेळपुरी सेंटर, जेवण व कोकणी पदार्थ विक्रेत्यांना डस्टबिन वितरित करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:06 PM 16/Dec/2025