Ratnagiri : कळझोंडी ग्रामस्थ अनेक समस्यांनी ग्रस्त

गणपतीपुळे : तालुक्यातील रत्नागिरी कळझोंडी गावातील प्रलंबित विकास कामे सातत्याने निवेदन देऊन पाठपुरावा करूनही मार्गे लागत नसल्याने कळझोंडीवासीय एकवटले असून, कानाडोळा करणाऱ्या प्रशासनाच्या विरोधात व्यापक जन आंदोलन उभारण्याचा थेट इशारा कळझोंडी जन आंदोलन समितीचे प्रमुख व सामाजिक कार्यकर्ते महादेव आग्रे, संदीप पवार, पांडुरंग सनगरे यांनी दिला आहे.

कळझोंडी गावातील फाटा क्रमांक २ ते कळझोंडी फाटा क्र. १ हा रस्ता एमआयडीसी सेस फंडातून मंजुर आहे. या रस्त्यावर एप्रिल २०२५ या कालावधीत खडी टाकून ठेवण्यात आली मात्र अद्याप डांबरीकरणाचे काम सुरू झालेले नाही. याबाबत निवेदन देऊन, पाठपुरावा करूनही हे काम दुर्लक्षित ठेवलेले आहे. या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत. वाहतुकीला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विद्यार्थी, ग्रामस्थ, प्रवासी दुर्लक्षित कामाबद्दल आवाज उठवत आहेत.

पावसात कळझोंडी धरण ते तिसंग मार्ग रस्त्याची दुर्दशा झाली आहे. या भागातील रस्त्याची साईडपट्टी धरणाच्या पाण्यात वाहून गेली. हा रस्ता मृत्यूला आमंत्रण देणारा ठरला असून या रस्त्यावर अपघात उद्भवल्यास मानव व वित्तहानी होऊ शकते अशी गंभीर परिस्थिती आहे. याबाबत वारंवार जीवन प्राधिकरण विभाग रत्नागिरी यांच्याकडे या रस्त्याचे काम दर्जेदार होण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. परंतु हे काम अद्याप कार्यान्वित झाले नसून सदरचे काम येत्या १० दिवसात मार्गी लावण्यात यावे. अशी ग्रामस्थांची मागणी आहे. कळझोंडी धरणाचे काम पूर्ण झाले असून येथील नवीन पाण्याची टाकी, नवीन पाईपलाईन, नवीन जॅकवेल नवीन पंप पाऊस सद्यस्थितीत चालू नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रादेशिक नळ पाणी योजनेला सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. नवीन योजना लवकरच चालू करण्यात यावी, अशी मागणी जन आंदोलन समितीने कार्यकारी, अभियंता जीवन प्राधिकरण विभाग रत्नागिरी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

गावातील बौद्धवाडी नजीकच बीएसएनएलचा टॉवर बांधण्यात आलेला आहे. या टॉवरमध्ये सातत्याने बिघाड होत असल्याने नागरिक, उद्योजक, व्यापारी, शासकीय कार्यालये यांना दैनंदिन कामकाजात अडथळे निर्माण होतात, ग्रामस्थांनी टॉवर यंत्रणेतील बिघाडामुळे तीव्र नाराजी दर्शवली आहे. १० दिवसांत सुधारणा कारण्याची मागणी ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली आहे.

कळझोंडी फाटा क्र.१ येथील रस्त्याच्या मोरीला सुमारे दोन फुटाचे भगदाड पडले आहे. एस.टी. वाहतूक सध्या रस्त्याच्या बाहेरील पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. या रस्त्यावर साईट पट्ट्या व खड्यांमुळे येथील वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या मार्गावरून जाताना ग्रामस्थ विद्यार्थी प्रवासी पर्यटक यांच्या जीविताला धोका निर्माण झाल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत वरील कार्यालयाला वेळोवेळी कळवूनही कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.

रत्नागिरी आगारातून सुटणारी दु.१ वाजता कळझोंडी मार्गे खंडाळा एस्टी बस ही अनियमित असून ती अचानक बंद करण्यात येते. ही एस्टी. बस नियमित सुरू करण्यात यावी. सायंकाळी ५.३० वाजता रत्नागिरी आगारातून सुटणारी रत्नागिरी कळझोंडी मार्गे वरवडे, रीळ, जयगड ही एसटीही न सांगता बंद करण्यात आली या गोष्टीला २ वर्षे लोटली तरी ती एसटी सेवा पूर्ववत झाली नाही. बस पूर्ववत करावी अशी मागणी रत्नागिरी आगार प्रमुख यांच्याकडे लेखी निवेदन देऊन केली आहे. येत्या १० दिवसांत सदर एस.टी. वाहतूक नियमित वेळेवर पूर्ववत सुरू ठेवण्यात आली नाही. गावात अनेक अडचणी असताना वारंवार त्या सोडवण्यासाठी ग्रामस्थ संबंधित प्रशासनाला विनवण्या करत आहेत मात्र तेथे दुर्लक्ष केले जात आहे अखेर कळझोंडीवासिय ग्रामस्थ जनआंदोलन समितीने व्यापक धरणे जन आंदोलनाचा इशारा दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:26 PM 16/Dec/2025