ST BUS : भंगार लिलावातून रत्नागिरी एसटी विभागाला सव्वातीन कोटी

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या आयुर्मान संपलेल्या गाड्यांचे स्पेअर पार्टस् व अन्य साहित्य बाजूला काढून गाड्यांच्या सांगाड्यांचा लिलाव करण्यात आला आहे. एकूण १४५ गाड्या भंगारात गेल्या आहेत. या लिलावातून रत्नागिरी विभागाला तब्बल सव्वा तीन कोटींचे उत्पन्न मिळाले आहे.

रत्नागिरी विभागातील विविध ९ डेपोतील काही वाहने जुनी झाली आहेत. तसेच सततच्या वाहतुकीमुळे एसटी नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. जुन्या बसेसची अवस्था खूप बिकट झाली होती. सीट, खिडक्या तुटलेल्या, एसटीचे पत्रे बाहेर आलेले आहेत. कित्येक एसटी बसेस पावसाळ्यात गळक्या होत्या. तशा अवस्थेतच प्रवाशांनी त्यातून प्रवास केला. त्यामुळे प्रवाशांकडूनही संताप व्यक्त करण्यात येत होता. स्टील, लोखंडापासून एसटीचा सांगडा बनविण्यात आल्याने ऊन, पावसामुळे तो गंजतो, त्यामुळे एसटीचे आयुर्मान १५ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. आयुर्मान संपलेल्या गाड्या वापरातून बाजूला काढल्या जातात.

रत्नागिरी विभागातील तब्बल १४५ एसटी बसेस भंगारात काढण्यात आल्या. एसटी भंगारात किंवा लिलावासाठी काढण्यापूर्वी त्या गाडीतील उपयुक्त व सुस्थितीतील साहित्य बाजूला काढले जाते. त्यामध्ये टायर, पत्रा, सीटस, विविध स्पेअरपार्टस, खिडक्या, दरवाजे, यंत्र बाजूला काढण्यात आले आहे. वापरासाठी कालबाह्य झालेल्या साहित्याची लिलाव पद्धतीने विक्री करण्यात आली आहे. या बसेसचे साहित्य वेगवेगळे करण्याचे काम टीआरपी येथील एसटी विभागाच्या जागेत सुरू आहे.

रत्नागिरी विभागातील एकूण १४५ एसटी बसेस भंगारात गेल्या आहेत. त्याचे लिलाव झाले असून एसटीस सव्वा तीन कोटींचा महसूल मिळाला आहे-प्रज्ञेश बोरसे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी

साहित्य उचलण्यास सुरुवात
रत्नागिरी विभागीय कार्यशाळेमध्ये सव्वातीन कोटींचा लिलाव करण्यात आला आहे. या लिलावाची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे लिलाव घेणाऱ्या कंपनीच्या संचालकांनी सर्व भंगाराचे साहित्य उचलण्यास सुरुवात केली आहे. मागील वर्षी चार कोटींचे उत्पन्न मिळाले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:42 PM 16/Dec/2025