7000 रुपयांची लाच घेताना गुहागरचा उपअभियंता एसीबीच्या जाळ्यात; जिल्हा परिषद अधिकारी रंगेहात पकडला

गुहागर/रत्नागिरी : जिल्हा परिषद बांधकाम विभाग, उपविभाग गुहागर येथील उपअभियंता संजय तुळशीराम सळमाखे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) ७ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. एका बांधकाम प्रकल्पाच्या देयकावर स्वाक्षरी करण्यासाठी वर्ग-१ मधील या अधिकाऱ्याने लाचेची मागणी केली होती. ही कारवाई मंगळवार, दि. १६ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आली.


नेमकं प्रकरण काय?

तक्रारदार (वय २६) हे एका ठेकेदाराकडे सुपरवायझर म्हणून काम करतात. ठेकेदार यांनी गुहागर तालुक्यातील वेळंब येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या हॉल बांधकामाचे कंत्राट घेतले आहे. या कामाच्या पहिल्या टप्प्याचे ३,५०,००० रुपयांचे पहिले धावते देयक (बिल) मंजुरीसाठी उपअभियंता संजय सळमाखे यांच्याकडे आले होते.
दिनांक १२ डिसेंबर २०२५ रोजी तक्रारदार हे देयकावर स्वाक्षरी घेण्यासाठी सळमाखे यांच्याकडे गेले असता, लोकसेवक सळमाखे यांनी या कामासाठी ७,००० रुपये लाचेची मागणी केली. या मागणीनंतर तक्रारदारांनी १६ डिसेंबर २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी (ACB Ratnagiri) यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली.

एसीबीचा सापळा

पडताळणी: तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक १६/१२/२०२५ रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कारवाईदरम्यान, लोकसेवक संजय तुळशीराम सळमाखे यांनी ७ हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
सापळा कारवाई: त्याच दिवशी, १६ डिसेंबर २०२५ रोजी, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुहागर येथील उपअभियंता, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कार्यालयात सापळा रचला. या सापळा कारवाईदरम्यान लोकसेवक संजय तुळशीराम सळमाखे यांना तक्रारदार यांच्याकडून ७,०००/- रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.
तत्काळ लाचखोर उपअभियंता सळमाखे यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पुढील कार्यवाही
सध्या आरोपी सळमाखे यांच्यावर गुहागर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच, आरोपीच्या राहत्या घराची झडती (घरझडती) घेण्याची कार्यवाही देखील चालू आहे. तपासणीसाठी त्यांचा मोबाईल देखील जप्त करण्यात आला आहे.
ही यशस्वी सापळा कारवाई पोलीस निरीक्षक सुहास रोकडे (फिर्यादी), स.पो.फौ. उदय चांदणे, पो.ह. दिपक आंबेकर, पो.शि. हेमंत पवार आणि पो.शि. राजेश गावकर यांच्या पथकाने केली. या कारवाईचे पर्यवेक्षण ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक श्री. शिवाजी पाटील आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री. भागवत सोनवणे तसेच रत्नागिरीचे पोलीस उपअधीक्षक श्री. अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री. मच्छिंद्र जाधव करत आहेत.