नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांना आणखी एक मोठा आंतरराष्ट्रीय सन्मान (International Honour) मिळाला आहे. आफ्रिकेतील इथियोपिया (Ethiopia) या देशाने पंतप्रधान मोदींना आपल्या सर्वोच्च नागरी सन्मान ( Highest Civilian Award) ‘ ग्रेट ऑनर निशान’ने ( The Great Honor Nishan of Ethiopia) सन्मानित केले आहे. या सन्मानासह पंतप्रधान मोदींना आतापर्यंत जगभरातील विविध देशांकडून मिळालेल्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांची संख्या जवळपास 28 वर पोहोचली आहे.
हा 140 कोटी भारतीयांचा सन्मान
इथियोपियाकडून मिळालेला सर्वोच्च सन्मान स्वीकारताना पंतप्रधान मोदींनी भावना व्यक्त करत सांगितले की, ‘हा माझा वैयक्तिक सन्मान नसून 140 कोटी भारतीयांचा सन्मान आहे. मी सर्व भारतीयांच्या वतीने हा सन्मान अत्यंत नम्रतेने आणि कृतज्ञतेने स्वीकारतो.’ हा सन्मान भारत-इथियोपिया भागीदारी घडवून आणणाऱ्या असंख्य भारतीयांचा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ग्लोबल साऊथमध्ये इथियोपियाची प्रेरणादायी भूमिका
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज संपूर्ण जगाचे लक्ष ग्लोबल साऊथ (Global South) कडे लागलेले असताना, इथियोपियाची स्वाभिमान, स्वातंत्र्य आणि आत्मगौरवाची चिरकालीन परंपरा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. भविष्य त्याच भागीदाऱ्यांचे असते, ज्या विश्वास आणि दीर्घकालीन दृष्टीकोनावर आधारित असतात, असेही त्यांनी नमूद केले.
भारत-इथियोपिया सहकार्य बळकट होणार
भारत इथियोपियासोबत असलेले सहकार्य पुढे नेण्यास कटिबद्ध असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले, जे बदलत्या जागतिक आव्हानांवर उपाय देईल आणि नव्या संधींची निर्मिती करेल. विविध क्षेत्रांतील सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये चर्चा होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.
इथियोपियात पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत
जॉर्डनहून पहिल्या द्विपक्षीय दौऱ्यावर इथियोपियात पोहोचलेल्या पंतप्रधान मोदींचे राजधानी अदीस अबाबा (Addis Ababa) येथे औपचारिक आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले. इथियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद अली (Abiy Ahmed Ali) यांनी स्वतः विमानतळावर उपस्थित राहून पंतप्रधान मोदींचे स्वागत केले.
दोन्ही पंतप्रधानांचा एकाच गाडीतून प्रवास
मैत्रीपूर्ण वातावरणाचे दर्शन घडवत, पंतप्रधान अबी अहमद अली यांनी पंतप्रधान मोदींना हॉटेलपर्यंत स्वतःच्या गाडीतून नेले. या प्रवासादरम्यान त्यांनी पंतप्रधान मोदींना सायन्स म्युझियम आणि फ्रेंडशिप पार्क दाखवण्याची खास व्यवस्था केली, जी आधीच्या कार्यक्रमात समाविष्ट नव्हती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:40 AM 17/Dec/2025














