रत्नागिरी : लिंगाणा सुळका सर करणे हे प्रत्येक गिर्यारोहकाचे एक स्वप्न असते. अनेक वर्षे मनात जपलेले हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याची इच्छा प्रत्येक दुर्गभटक्या व गिर्यारोहकाच्या मनात असते. लिंगाणा किल्ला पाहण्यासाठी गिर्यारोहणाची जोखीम पत्करणे अपरिहार्य ठरते आणि त्याचबरोबर लिंगाणा सुळक्याचे आव्हानही स्वीकारावे लागते.
अशाच या कठीण व धाडसी आव्हानाला यशस्वीपणे सामोरे जात रत्नागिरीतील १३ वर्षीय सृजन सतीश पटवर्धन याने लिंगाणा सुळका यशस्वीपणे सर केला. सृजन हा रत्नागिरीतील दामले हायस्कूलचा विद्यार्थी असून एवढ्या कमी वयात त्याने केलेली ही कामगिरी सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
ही मोहिम ‘जिद्दी माउंटेनिरिंग’ या अनुभवी संघाच्या नेतृत्वाखाली पार पडली. जिद्दी माउंटेनिरिंग संस्था माउंटेनिरिंगचा प्रसार आणि प्रचार करून साहसी मोहिमा यशस्वीरित्या पूर्ण करणारी महाराष्ट्रातील महत्वाची संस्था आहे. या आधी त्याने वजीर, सुळ्या, भांबुर्डे नवरा, नवरी, करवली या सुळक्यांवर यशस्वी आरोहण केले आहे. माउंटेनिरिंग योग्य मार्गदर्शन, शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि स्वतःची जिद्द यांच्या जोरावर सृजनने हे कठीण शिखर सर करत आपली क्षमता सिद्ध केली.
सृजनच्या या यशामुळे कुटुंबीय, शिक्षक, मित्रमंडळी तसेच गिर्यारोहण क्षेत्रातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भविष्यातही अशाच अनेक साहसी मोहिमा यशस्वीपणे पार पाडून तो नव्या पिढीसमोर आदर्श निर्माण करेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:03 AM 17/Dec/2025












