चिपळूण : शहरानजीकच्या कळंबस्ते ते काडवली मार्गावरील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. दिवाळीत माजी सभापती शौकत मुकादम यांनी या खड्ड्यांमध्ये फटाके वाजवून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. पावसाळा संपल्यानंतर ठेकेदाराने या मार्गावरील खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात केली आहे.
कळंबस्ते ते धामणंद पंधरागावकडे जाणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र कळंबस्ते मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात तर वाहनचालकांची मोठी कसरत झाली. खड्यांमुळे या मार्गावर किरकोळ अपघाताच्या घटनादेखील घडल्या. या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन माजी सभापती शौकत मुकादम यांनी दिवाळीत फटाके वाजवून प्रशासनाचे लक्ष वेधले. यावर सार्वजनिक बांधकाम उपविभाग खेडच्या अधिकाऱ्यांनी पावसाळ्यानंतर खड्डे बुजवले जातील, अशी ग्वाही दिली.
यानुसार ठेकेदाराने गेल्या दोन दिवसांपासून या मार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे. खड्डे बुजवताना काही मीटर रस्त्याचे डांबरीकरण केले जात असल्याने खड्ड्यांची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे.
पाली-निरबाडे रस्त्यावरील खड्डे कधी बुजणार
पाली ते निरबाडे मार्गावरदेखील मोठ्या खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात तर वाहनचालकांचे हाल झाले. याबाबत प्रसिद्धी माध्यमांमधून या मार्गावरील खड्ड्यांच्या दुरवस्थेबाबत वृत्त प्रसिद्ध झाले होते. यानुसार या मार्गावरील खड्डे बुजवण्याबाबतची निविदादेखील प्रसिद्ध झाली. मात्र अजूनही या कामाला सुरुवात झालेली नाही. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन लवकरच या मार्गावरील खड्डे बुजवण्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:54 AM 17/Dec/2025














