मंडणगड : तालुक्यातील कुंबळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत येणाऱ्या पालघर आरोग्य उपकेंद्रासाठी बांधलेली नवीन इमारत अनेक महिने उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असल्यामुळे येथील आरोग्य सुविधेचे कामकाज अद्याप सुरू करण्यात आले नसल्याची बाब समोर आली आहे. यासंदर्भात आरोग्य यंत्रणेच्या कामकाजासंदर्भात नागरिकांनी शंका उपस्थित केल्या असून, या इमारतीमध्ये आरोग्य सुविधा सुरू कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
पालघर उपकेंद्रासाठी केळवत येथील हनुमान मंदिराजवळील मराठी शाळेची जागा निश्चित करण्यात आली असून याठिकाणी नवीन प्रशस्त इमारत बांधून तयार आहे. उपकेंद्रासाठी शासनाकडून मोठा निधी खर्च करण्यात आला. उपकेंद्राची ही नवीन इमारत आधुनिक सुविधांनी युक्त आहे. मात्र, आरोग्य प्रशासनाकडून उद्घाटनाचा कार्यक्रम ठरवण्यात होत असलेल्या दिरंगाईमुळे लोकांच्या आरोग्याच्या गरजांकडे दुर्लक्ष होत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
सद्या पालघर परिसरात रुग्णांना भाड्यानी घेतलेल्या इमारतीतील अपुऱ्या जागेत उपचार घ्यावे लागत असून, नवीन इमारत सुरु झाल्यास गरोदर माता, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांना उपचाराकरिता सोयीचे ठरू शकते. त्यामुळे इमारतीचे उद्घाटन अखेर कधी, असा प्रश्न पालघर पंचक्रोशीतील नागरिक विचारू लागले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:58 PM 17/Dec/2025












