Chiplun : कौटुंबिक वादातून आशासेविकेस मारहाण; पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा

चिपळूण : कौटुंबिक वादातून घटस्फोटाचा दावा सुरू असताना आशासेविका असलेल्या एका महिलेस तिच्या पतीने व सासरच्या व्यक्तींनी एकत्र येऊन मारहाण केल्याची धक्कादायक घटना चिपळूण तालुक्यातील खडपोली ब्राम्हणवाडी येथे १५ डिसेंबर रोजी सायंकाळी घडली.

याप्रकरणी फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी वैभव पांडुरंग तांबट, विनोद पांडुरंग तांबट, विशाखा विनोद तांबट, रोहिणी रविंद्र पंडव आणि श्रद्धा गणेश गांजेकर अशा एकूण पाच आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिपळी खुर्द येथील रहिवासी असलेल्या वैष्णवी वैभव तांबट (वय ४३) यांचा विवाह आरोपी वैभव पांडुरंग तांबट यांच्याशी १८ वर्षांपूर्वी झाला होता. मात्र, कौटुंबिक कारणांमुळे दोघांमध्ये सतत वाद होऊन मतभेद झाले.

यामुळे गेल्या साडेतीन वर्षांपासून वैष्णवी तांबट यांनी खेड कोर्टात घटस्फोट मिळवण्यासाठी दावा दाखल केला आहे. १५ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी सव्वापाच वाजताच्या सुमारास वैष्णवी तांबट या आशासेविका असल्याने त्यांची बचत गटाची बैठक खडपोली ब्राम्हणवाडी येथे होती. मिटींगसाठी जात असताना त्यांना एका रिक्षातून त्यांचे माजी पती वैभव तांबट एका महिलेसोबत जाताना दिसले. त्यांना पाहून वैष्णवी तांबट यांनी त्यांच्या प्लेझर दुचाकीवरून त्यांचा पाठलाग करत वैभव तांबट यांच्या राहत्या घराचे अंगणात गाठले.

या ठिकाणी वैष्णवी आणि वैभव तांबट यांच्यात वाद सुरू झाला. या वादादरम्यान वैभव तांबट यांनी वैष्णवी यांना शिवीगाळ करत दमदाटी केली आणि हाताचे थापडाने मारहाण करून ढकलून दिले. त्यानंतर त्यांनी जवळच असलेल्या विनोद पांडुरंग तांबट यांना बोलावून घेतले. विनोद तांबट यांनी आपल्या हातातील काठीने वैष्णवी यांच्या उजव्या मांडीवर मारहाण करत शिवीगाळ केली. एवढ्यावरच न थांबता विशाखा विनोद तांबट यांनी हाताचे चुक्याने वैष्णवी यांच्या पाठीवर मारले, तर रोहिणी रविंद्र पंडव यांनी त्यांचे दोन्ही हात पिरगळले. तसेच, श्रद्धा गणेश गांजेकर यांनी हाताच्या साहाय्याने धक्काबुक्की करत वैष्णवी यांना घराच्या अंगणाबाहेर काढले.

या संपूर्ण मारहाणी आणि धक्काबुक्कीच्या घटनेनंतर वैष्णवी तांबट यांनी पोलिसांत धाव घेतली. या घटनेची नोंद घेत पोलिसांनी दिनांक १५ डिसेंबर रोजी रात्री उशिरा १० वाजून ३५ मिनिटांनी पाचही आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता कायद्यानुसार कलम १८९(२), १९०, ११५(२), ११८(२), ३५१(२), ३५२ नुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:55 PM 17/Dec/2025