गुहागर : प्रसुतीसाठी आलेल्या महिलेला बराच तास ताटकळत ठेवल्याने प्रसुतीनंतर बाळ दगावल्याचा प्रकार गुहागर ग्रामीण रुग्णालयात काल मंगळवारी घडला. याप्रकरणी येथील वैद्यकीय अधिकाऱ्याचा हलगर्जी व निष्काळजीपणा समोर आला असून त्याने आपली चूक कबुल केल्याने व नातेवाईकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे गुहागर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तालुक्यातील वरवेली येथील शिंदे आडनावनामक महिला प्रसुतीसाठी गुहागर ग्रामीण रुग्णालयात काल मंगळवारी पहाटे 5 वाजता दाखल झाली होती. सकाळी 8 वाजेपर्यंत या महिलेची प्रसुती झाली नव्हती. त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी तिला प्रसुतीसाठी इतर रुग्णालयांमध्ये नेण्याचे ठरविले मात्र, ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी हजारे यांनी त्यांना जाण्यास नकार दिला. व्यवस्थित नार्मल प्रसुती होईल असे सांगत त्यांना अन्यत्र रुग्णालयात जाण्यास थांबवले.
तसेच त्यांनी प्रसुतीपूर्व सोनोग्राफीही पाहिली नाही. दुपारी 12 वाजताच्या दरम्यान, या महिलेची नॉर्मल प्रसुती झाली मात्र, लगेच बाळ दगावले. डॉक्टरच्या या हलगर्जीपणामुळेच बाळ दगावल्याने एकच खळबळ उडाली. प्रसुती महिलेच्या वरवेली गावातील अनेक ग्रामस्थ त्यांना समजताच रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी तेथे डॉक्टरला जाब विचारला. तुम्ही एवढे तास महिला रुग्णाला का ताटकळत ठेवलात असा जाब विचारुन तुमच्या हलगर्जीपणामुळेच बाळ दगावल्याचा आरोप केला. स्वतः डॉक्टरनेही आपली चूक मान्य केल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी पोलीस तपास सुरु आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:43 PM 17/Dec/2025












