दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील कात कारखान्यांमधून दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असून, या व्यवसायाला खैर तस्करीची मोठी जोड असल्याचे समोर येत आहे. या आर्थिक व्यवहारांतून देशविरोधी व दहशतवादी कारवायांना अप्रत्यक्ष बळ मिळत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील कात कारखाने हे सध्या तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहेत. उपलब्ध माहितीनुसार रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यात मिळून १०२ कारखाने आहेत.
चिपळूण, सावर्डे हा परिसर कात व्यवसायाचा प्रमुख केंद्रबिंदू मानला जात आहे. याच पार्श्वभूमीवर नुकतीच सक्तवसुली संचालनालयाने खेड आणि सावर्डे येथील कात कारखान्यांवर धडक कारवाई सुरू केली. काही कारखानदारांच्या वर्तणुकीतून दिसणारा आर्थिक रुबाब, अब्जावधी रुपयांची मालमत्ता, तसेच संशयास्पद आर्थिक व्यवहार यामुळे तपास यंत्रणांचे लक्ष या व्यवसायाकडे वेधले गेले आहे. खैर तस्करीशी संबंधित कात निर्मिती कारखान्यांबाबत या पूर्वीही न्यायालयाने कडक भूमिका घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयाने रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल १०२ कात कारखाने बंद करण्याचे आदेश दिले होते.
तसेच खैर तस्करी प्रकरणात प्रत्यक्ष सहभाग असलेल्या कात व्यावसायिकांवर कठोर कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना वन विभागाला देण्यात आल्या होत्या. दरम्यान, जिल्ह्यात ईडीकडून सुरू असलेल्या कारवाईतून नेमके काय निष्पन्न होते, कोणत्या आर्थिक साखळ्या उघड होतात आणि पुढील कारवाईची दिशा काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:35 AM 18/Dec/2025














