Ratnagiri : भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाची जबाबदारी ग्रामसेवकांवर

रत्नागिरी : उनाड जनावरे, भटक्या कुत्र्यांचा प्रश्न आता शहरी भागातच नाही तर ग्रामीण भागातही सतावू लागला आहे. विशेषतः शहरानजीक असणाऱ्या गावांमध्ये याचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी ग्रामीण भागात ग्रामविकास अधिकाऱ्यांवर जबाबदारी टाकण्यात येणार आहे. तालुक्यात सुमारे चार हजार भटके कुत्रे असल्याची नोंद असून, नेहमीचे कामकाज संभाळून ही अतिरीक्त जबाबदारी सांभाळताना आता ग्रामसेवकांना कसरत करावी लागणार आहे.

ग्रामीण भागात उनाड कुत्र्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. या कुत्र्यांच्या वाढीवर नियंत्रण ठेवायचे कसे हा प्रश्न आहे. विशेषतः शहरालगतच्या गावांमध्ये व पंचक्रोशीच्या ठिकाणी भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे. यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. काही महिन्यापूर्वी सुप्रिम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार त्यांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना राज्य शासनाने जिल्हा परिषद व पंचायत समितीला दिल्या आहेत.

रत्नागिरी पंचायत समितीत नुकत्याच झालेल्या बैठकीत पशुसंवर्धन विभागामार्फत याची माहिती तालुक्यातील ग्रामविकास अधिकाऱ्यांना देण्यात आली. तालुक्यात २०२४ मध्ये झालेल्या पशु जनगणनेमध्ये ३८४४ भटकी कुत्रे आढळून आले होते. रत्नागिरी शहरामध्ये ८३५ भटक्या कुत्र्यांची नोंद आहे. मात्र या नोंदीहून अधिक भटके कुत्रे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. रत्नागिरी शहरालगतच्या नाचणे, कुवारबाव, कारवांचीवाडी, मिरजोळे, शिरगाव, भाट्ये या भागातही भटक्या कुत्र्यांचे प्रमाण अधिक आहे. पंचक्रोशीच्या पाली, पावस, जाकादेवी, गणपतीपुळे, खंडाळा या भागातही भटक्या कुत्र्यांची संख्या अधिक आहे. गावातील भटक्या कुत्र्यांची नोंद ग्रामविकास अधिकाऱ्यांनी ठेवायची आहे. लवकरच या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाची मोहीम एनजीओच्या माध्यमातून राबवली जाणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:48 AM 18/Dec/2025