रविंद्र चव्हाण यांच्या शिफारशीने ४ कोटींचा निधी मंजूर; ४२ कामांना मिळणार गती

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासाला मोठी गती मिळाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रविंद्रजी चव्हाण यांच्या विशेष शिफारशीने आणि पाठपुराव्यामुळे रत्नागिरी तालुक्यात विविध विकासकामांसाठी तब्बल ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे ग्रामीण भागातील रखडलेली कामे मार्गी लागणार असून, स्थानिक भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

नेमकी घडामोड काय?

आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे वारे आता वाहू लागले आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात विकासकामांचा धडाका लावणे आवश्यक होते. ही गरज ओळखून भारतीय जनता पार्टीच्या रत्नागिरी तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्रजी चव्हाण यांची भेट घेऊन विकासनिधीची मागणी केली होती.

कार्यकर्त्यांच्या या मागणीची मा. चव्हाण साहेब यांनी तत्काळ दखल घेतली. त्यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री मा. ना. श्री. जयकुमार गोरे यांच्याशी तातडीने पत्रव्यवहार केला आणि रत्नागिरीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची शिफारस केली.

४२ कामांचा मार्ग मोकळा

रविंद्र चव्हाण यांच्या शिफारशीनंतर नामदार जयकुमार गोरे यांनी तात्काळ हालचाली करत रत्नागिरी तालुक्यातील विविध ४२ कामांसाठी ‘२५/१५’ या हेडखाली निधी उपलब्ध करून दिला आहे. या संपूर्ण प्रक्रियेत आणि पाठपुराव्यामध्ये मा. चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक श्री. अनिकेत पटवर्धन यांनी मोलाची कामगिरी बजावली.

कार्यकर्त्यांकडून आभार व्यक्त

एकाच वेळी ४ कोटींचा मोठा निधी आणि ४२ कामांना मंजुरी मिळाल्यामुळे रत्नागिरी तालुक्यातील ग्रामीण भागात विकासाचे नवचैतन्य निर्माण झाले आहे. याबद्दल भाजप कार्यकर्त्यांनी मा. रविंद्रजी चव्हाण, मंत्री जयकुमार गोरे आणि अनिकेत पटवर्धन यांचे विशेष आभार मानले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:57 AM 18/Dec/2025