लांजात फिरते शौचालय सुरू; शहर समन्वय समितीच्या पाठपुराव्याला यश

लांजा : शहरात कोत्रे हॉटेलनजिकचे सुलभ शौचालय नगरपंचायतीने तोडल्याने नागरिकांची गैरसोय झाली होती. होणारी गैरसोय लक्षात घेऊन त्वरित फिरते सुलभ शौचालय उभारा, अशा शहर समनव्य समितीने केलेल्या मागणीला यश आले असून मंगळवारपासून शहरात फिरते शौचालय सुरू झाले आहे.

शहर समन्वय समितीने नगरपंचायतीकडे सतत पाठपुरावा केला. मात्र याबाबत नगर पंचायतीने कार्यवाही न केल्याने अखेर शहर समन्वय समितीने मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन मागणीचे पत्र देत चर्चा केली. शहरातील कोत्रे हॉटेलनजिक सुलभ शौचालय अनेक वर्षांपासून होते. मात्र हे शौचालय सध्या महामार्ग चौपदरीकरणात अधिग्रहीत केले असल्याने सुलभ शौचालयाचे बांधकाम तोडण्यात आले. त्यामुळे नागरिक, प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. शौचालयाचे बांधकाम तोडण्यापूर्वी पर्यायी व्यवस्था केली नाही. सुलभ शौचालय नसल्याने ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या नागरिक व प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता शहर समन्वय समितीने नगर पंचायतीकडे फिरते सुलभ शौचालय बसविण्याची मागणी केली होती.

त्यावर मुख्याधिकारी अभिजित कुंभार यांनी दिलेल्या आश्वासना प्रमाणे मंगळवारपासून फिरते शौचालय सुरू झाले आहे. निवेदन देताना शहर समन्वय समिती अध्यक्ष प्रसन्न शेट्ये, निरंजन देशमुख, शेखर स्वामी, मंदार भिंगार्डे उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:32 PM 18/Dec/2025