रत्नागिरी : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे महर्षी कर्वे महिला महाविद्यालय, रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित एन. एस. एस. विशेष श्रम संस्कार 7 दिवसीय निवासी शिबिरांतर्गत दिनांक १८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता शिरगाव येथे जलस्वच्छता व वनराई बंधारा बांधणीचा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. विशेष बाब म्हणजे हा बंधारा पूर्णतः महाविद्यालयाच्या NSS स्वयंसेविका विद्यार्थिनींनी श्रमदानातून बांधला.
हा उपक्रम “Youth for Sustainable Development – Special Focus on Watershed Management and Wasteland Development” या थीमअंतर्गत राबविण्यात आला. ग्रामपंचायत शिरगावच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या उपक्रमात स्वयंसेविकांनी जलस्रोतांची स्वच्छता करणे तसेच वनराई बंधारा उभारणीची कामे अत्यंत उत्साहाने पार पाडली. या बंधाऱ्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा साठा वाढून परिसरातील भूजलपातळी सुधारण्यास मदत होणार असून शेती व पर्यावरण संवर्धनाला चालना मिळणार आहे.
या उपक्रमासाठी शिरगाव ग्रामपंचायत सरपंच मा. सौ. फरीदा काझी, ग्रामपंचायत अधिकारी मा. श्री. उल्हास कोळी, रत्नागिरी प्रकल्प समितीचे सदस्य मा. श्री. प्रसन्न दामले यांचे सहकार्य लाभले. या उल्लेखनीय उपक्रमाबद्दल रत्नागिरी प्रकल्प अध्यक्षा मा. विद्याताई कुलकर्णी, प्रकल्पप्रमुख मा. श्री. मंदार सावंतदेसाई, बीसीए कॉलेजच्या प्र. प्राचार्या मा. नेहा कोतवडेकर यांनी एन. एस. एस. स्वयंसेविका, एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी कु. श्रुती यादव, आयोजक व ग्रामपंचायतीचे अभिनंदन केले. या उपक्रमातून विद्यार्थिनींमध्ये जलसंवर्धनाचे महत्त्व, पर्यावरणाबाबतची जाणीव व सामाजिक बांधिलकी अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसून आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:20 PM 18/Dec/2025












