खेड : लवेल येथील घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (GIT) येथे “Design-To-Impact: Design Thinking, Innovations & Entrepreneurship with Project-Based Learning” या विषयावर पाच दिवसीय प्राध्यापक विकास कार्यक्रम (FDP) दि. ८ ते १२ डिसेंबर २०२५ या कालावधीत यशस्वीरीत्या पार पडला. हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य प्राध्यापक विकास अकादमी (MSFDA) यांच्या वतीने विज्ञान आश्रम, पाबळ (पुणे) यांच्या सहकार्यान आयोजित करण्यात आला होता.
या प्राध्यापक विकास कार्यक्रमाचा मुख्य उद्देश प्राध्यापकांमध्ये डिझाइन थिंकिंग, नवोपक्रम, उद्योजकता तसेच अनुभवाधारित व प्रकल्पाधारित अध्यापन कौशल्यांचा विकास करणे हा होता. कार्यक्रमात प्रत्यक्ष कृतीआधारित उपक्रम, क्षेत्रभेटी, समूहचर्चा आणि प्रकल्पाधारित शिक्षणाचा प्रभावी समावेश करण्यात आल्याने सहभागी प्राध्यापकांना अध्यापनातील नवे दृष्टिकोन आत्मसात करण्याची संधी मिळाली. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे टेक्निकल डायरेक्टर डॉ. ए. बी. मराठे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी GIT चे प्राचार्य डॉ. प्रमोद बी. पाटील यांनी नवोपक्रमाभिमुख आणि समाजाभिमुख अध्यापन पद्धतींचे महत्त्व अधोरेखित केले. FDP चे समन्वयक व डीन-IIIE सेल डॉ. समीर एस. गजमल यांनी कार्यक्रमाची उद्दिष्टे, स्वरूप आणि अपेक्षित परिणाम यांची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.
या FDP दरम्यान विज्ञान आश्रम, पाबळ येथील नामवंत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. यामध्ये डॉ. अरुण दीक्षित, प्रमुख -डिझाइन इनोव्हेशन सेंटर, विज्ञान आश्रम, श्री. रणजित शानबाग, उद्योग व सहकार्य क्षेत्रातील तज्ज्ञ, श्री. प्रसाद पाटील, प्रोग्राम ऑफिसर – डिझाइन इनोव्हेशन सेंटर, डॉ. यशवंत प्रसाद, ग्रामीण तंत्रज्ञान विकास विषयात IIT दिल्ली येथून पीएच.डी. पूर्ण केलेले व सध्या विज्ञान आश्रमचे सदस्य तसेच विज्ञान आश्रमचे माजी विद्यार्थी आणि कोकणातील कृषी उद्योजक श्री. तेजस यांचा समावेश होता. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे प्राध्यापकांना प्रत्यक्ष समस्यांवर आधारित उपाययोजना सुचविण्याचा अनुभव मिळाला.
घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीसह परिसरातील विविध शैक्षणिक संस्थांमधील प्राध्यापकांनी या प्राध्यापक विकास कार्यक्रमात मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमांतर्गत सहभागी प्राध्यापकांनी लवेल गाव, घरडा हॉस्पिटल तसेच GIT कॅम्पस येथे क्षेत्रभेटी देऊन प्रत्यक्ष समस्यांची ओळख करून घेतली. पाणीटंचाई, रुग्णसेवेशी संबंधित तयारी आणि संस्थेतील पाण्याची गळती यांसारख्या स्थानिक समस्यांवर विद्यार्थ्यांच्या मिनी-प्रकल्पांच्या माध्यमातून उपाययोजना करण्यासाठी विज्ञान आश्रम आणि GIT यांच्यात सहकार्य करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यासोबतच विज्ञान आश्रमने GIT मधील विद्यार्थ्यांसाठी स्टायपेंडसह इंटर्नशिप उपलब्ध करून देण्यासही सहमती दर्शवली.
या कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी सहभागी प्राध्यापकांचे अभिप्राय सत्र पार पडले. यानंतर सर्व सहभागी प्राध्यापकांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. व्यावहारिक दृष्टिकोन, नवोपक्रमाभिमुख अध्यापन पद्धती आणि समाजाभिमुख शिक्षण मॉडेल यांमुळे हा प्राध्यापक विकास कार्यक्रम अत्यंत उपयुक्त आणि प्रेरणादायी ठरल्याचे सहभागी प्राध्यापकांनी नमूद केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:47 PM 18/Dec/2025












