Ratnagiri : हवामान बदलामुळे सर्दी, खोकल्यासह तापाचे रूग्णामध्ये वाढ

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून हवामानात मोठा बदल झालेला असून वातावरणात चढ उतार जाणवत आहे. दुपारी उन्हाचे चटके, घाम येत आहे तर रात्री, पहाटे थंडी पडत आहे. सततच्या हवामान बदलामुळे सर्दी, खोकल्यासह तापाचे रूग्ण वाढत आहे. खासगीसह जिल्हा रूग्णालयात ओपीडी हाऊसफुल्ल झाली आहे.

थंडीचा महिना हा आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचा मानला जातो. थंडीत भूक वाढते, आहार चांगला राहतो आणि शरीर सुदृढ ठेवण्यास मदत होते. याच काळात विषाणूजन्य आजारांचा धोका वाढतो. शहरातील वाढलेली धूळ, वाहतूक कोंडीमुळे होत असलेले प्रदूषण, सतत बदलत राहणारे हवामान यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. परिणामी घसा दुखणे, सर्दी, खोकला, ताप, श्वसनविकार यासारख्या तक्रारी वाढताना दिसत आहे. विशेषता ज्येष्ठ नागरिकांमध्ये सांधेदुखी, गुडघेदुखी, संधिवाताच्या वेदना तीव्र होत आहेत. हाडे आणि सांधे थंडीत अधिक कडक होतात. त्यामुळे जुनाट आजार असलेल्या रुग्णांना या दिवसात अधिकचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे त्याआधीच विशेष काळजी घेणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

अंगदुखीसह सर्दी, खोकल्याचे रुग्ण अधिक
सध्या थंडीच्या लाटेला थोडा उशीर असला तरी वातावरणातील बदलामुळे शीतपेय, गार पाणी, वातानुकूलित यंत्रणांचा अतिवापर, धूळ यामुळे सर्दी, खोकल्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर घसा दुखणे, अंगदुखी अशा तक्रारी वाढत आहेत. त्याचबरोबर श्वसनसंस्थेवर परिणाम होत असून दमा, कोरडा खोकला, श्वास घेण्याचे त्रास वाढणे अशा रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:53 PM 18/Dec/2025