रत्नागिरी : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी १८ डिसेंबर रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून १ जानेवारी २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) सन १९५१ चा कायदा २२ प्रमाणे अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी केले आहे.
जिल्ह्यात येत्या दोन आठवड्यात राजकीय उलथापालथ तसेच नववर्ष स्वागत तसेच खेड, चिपळूण, अलोरे-शिरगांव, रत्नागिरी, जयगड तसेच देवरुख या ठिकाणी, मोठ्या प्रमाणावर औद्योगिक कारखाने असून, स्थानिकांकडून विविध मागण्यांसाठी अचानक संप व आंदोलन पुकारण्यात येत असतात. तसेच रत्नागिरी जिल्ह्यात विविध राजकीय पक्ष, विविध संघटना तसेच वेगवेगळ्या घटकांतील नागरिकांकडून त्यांचे विविध मागण्यांसाठी आंदोलने केली जातात.
या पार्श्वभूमीवर आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यामध्ये बहुतांशी गावांमध्ये हिंदू, बौद्ध तसेच इतर धर्मियांची मिश्रवस्ती असल्याने काही वैयक्तीक कारणांमुळे जातीय तणावाच्या घटना घडून दखलपात्र व अदखलपात्र गुन्हे घडून त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होवू शकते.
नगरपालिका/नगरपंचायत निवडणुकीसाठी आचारसंहिता सुरू असून, रत्नागिरी शहर पोलीस ठाणे हद्दीतील प्रभाग क्र.१० मध्ये लागू असून प्रभागाचे मतदान २० डिसेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीची मतमोजणी २१ डिसेंबर रोजी होणार आहे. अशा वेळी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणे, सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिका-टिपण्णी करणे यामुळे राजकीय तणाव निर्माण होवून कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होवू शकते. आगामी काळात जिल्हा परिषद/पंचायत समिती निवडणुका लक्षात घेता सामाजिक संघटना व राजकीय पक्ष पक्ष वाढीसाठी दौरे तसेच सभा घेत असून त्यामुळे त्यांचे कार्यकर्त्यांकडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जावू शकतो. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आवश्यक असल्याने मनाई आदेश जारी करण्यात आला आहेत.
प्रतिबंधात्मक आदेशादरम्यान शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरता येतील अशी हत्यारे, सोटे, तलवारी, बंदुका, सुरे लाठ्या अगर कोणतीही वस्तू घेवून फिरणे, अंग भाजून टाकणारा कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ घेवून फिरणे, दगड किंवा इतर शस्त्रे, हत्यारे किंवा शस्त्र फेकावयाची साधने बरोबर घेवून फिरणे, गोळा करणे किंवा तयार करणे, सभ्यता अगर निती याविरुद्ध किंवा शांतता धोक्यात येईल, अशी भाषणे करणे अगर सोंग आणणे अगर कोणतीही वस्तू किंवा जिन्नस तयार करणे व लोकांमध्ये प्रसार करणे. इसम अगर प्रेते किंवा आकृती यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे. सार्वजनिक रितीनी घोषणा करणे, गाणी गाणे, वाद्य वाजविणे. पाच किंवा पाचपेक्षा जास्त इसमांना विना परवानगी एकत्रित येण्यास मनाई आहे. अंत्ययात्रा, धार्मिक विधी, लग्न सोहळा, सामाजिक सण, शासकीय कार्यक्रम, शासकीय सेवेत तैनात कर्मचारी, सार्वजनिक करमणुकीची सिनेमागृह, रंगमंच इत्यादी बाबींना प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाहीत.
प्रतिबंधात्मक आदेशाच्या काळात कोणालाही मोर्चा, मिरवणुका तसेच सभा निवडणूक प्रचार सभा घ्यायच्या झाल्यास संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांची लेखी परवानगी आवश्यक असून, परवानगीनंतरच प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:53 PM 18/Dec/2025














