खेड : खेड-मंडणगड मार्गावर भिलारेआयनी गावानजीक गुरुवारी (दि. १८) दुपारी साडेतीनच्या सुमारास एसटी बस आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत दुचाकीस्वार विलास कोरपे (वय ६५, रा. आयनी चव्हाणवाडी, ता. खेड) यांचा जागीच मृत्यू झाला.
या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मंडणगडहून खेडकडे येणाऱ्या एसटी बसची आणि समोरून येणाऱ्या विलास कोरपे यांच्या दुचाकीची भिलारे आयनी गावाजवळ समोरासमोर धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीचा पूर्णपणे चक्काचूर झाला, तर एसटी बसचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
अपघाताची तीव्रता पाहता घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. विलास कोरपे हे खेड येथून दुचाकीवरून आयनी गावाकडे जात असताना हा अपघात घडला. त्यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून आयनी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून या प्रकरणी नोंद करण्यात आली आहे. अपघात नेमका कसा घडला, याचा अधिक तपास सुरू आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:29 19-12-2025














