गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे देवदर्शन आणि पर्यटनासाठी मुंबईहून आलेल्या पर्यटकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवार (दि. १७ डिसेंबर) रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. अनिल लक्ष्मण पाथरे (५७, रा. साकिनाका, मुंबई असे या पर्यटकांचे नाव आहे.
साकीनाका मुंबई येथून अनिल लक्ष्मण पाथरे, दीपक पांडुरंग लाटे (५४) व चंद्रकांत नामदेव विरखडे (५८) असे तिघेजण गणपतीपुळे येथे १७ डिसेंबर रोजी देवदर्शन व पर्यटनासाठी सायंकाळी साडेसातच्या सुमारास आले होते. यावेळी त्यांनी देवदर्शन व पर्यटनाचा घेतल्यानंतर रात्री गणपतीपुळे येथील एका हॉटेलमध्ये जेवण आटोपल्यानंतर मुक्कामासाठी गणपतीपुळे येथील एका लॉजवर ते गेले. तेथे अनिल पाथरे यांना अचानकपणे उलट्या व अशक्तपणा जाणवू लागला. यावेळी त्यांना तत्काळ त्यांच्या दोन मित्रांनी गणपतीपुळे येथील एका दवाखान्यात नेले. मात्र त्या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नसल्याने त्यांनी तत्काळ मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी नेले. यावेळी त्यांची प्राथमिक तपासणी केली असता वैद्यकीय अधिकारी सौ. पवार यांनी त्यांना मृत घोषित केले. यानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जाकादेवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला.
या बाबत अधिक तपास जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गणपतीपुळे क्षेत्राचे पोलिस कर्मचारी अनिल गुरव व संदीप साळवी करीत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:55 19-12-2025














