चिमुकल्यांच्या हृदयाला मिळणार बळ! ना. उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या मोफत हृदय शस्त्रक्रिया व 2D इको शिबिर

रत्नागिरी : कोकणातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील लहान मुलांच्या हृदयाचे आरोग्य सुरक्षित राहावे, यासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री ना. श्री. उदयजी सामंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ० ते १८ वयोगटातील मुलांसाठी उद्या, शनिवारी ‘मोफत 2D इको तपासणी आणि हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे.

यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, प्रख्यात ज्युपिटर हॉस्पिटल (ठाणे), उदयजी सामंत वैद्यकीय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि आरोग्यदूत फाउंडेशन या सर्वांनी एकत्र येत हा आरोग्यदायी उपक्रम हाती घेतला आहे.

शिबिराचा तपशील:

  • दिनांक: शनिवार, २० डिसेंबर २०२५ (उद्या)
  • वेळ: सकाळी १०.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत
  • स्थळ: जिल्हा शासकीय रुग्णालय (Civil Hospital), रत्नागिरी.

तज्ज्ञ डॉक्टरांकडून होणार तपासणी

या शिबिरासाठी ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉ. आशितोष सिंग आणि त्यांची टीम खास उपस्थित राहणार आहे. ० ते १८ वयोगटातील मुलांची मोफत 2D इको तपासणी केली जाईल आणि ज्यांना शस्त्रक्रियेची गरज आहे, त्यांच्यावर पुढील उपचार मोफत किंवा सवलतीच्या दरात करण्यासाठी मार्गदर्शन केले जाईल.

समाजातील दुर्बल घटकांसाठी आधार

ग्रामीण भागातील अनेक पालकांना आपल्या मुलांच्या महागड्या हृदय शस्त्रक्रिया करणे परवडत नाही. अशा पालकांसाठी हे शिबिर एक वरदान ठरणार आहे. या उपक्रमाचे नेटके नियोजन आमदार श्री. किरण (भैय्यासाहेब) सामंत आणि आरोग्यदूत मंगेश चिवटे यांनी केले आहे.

आयोजकांचे आवाहन

या शिबिराला खुद्द पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत उपस्थित राहणार आहेत. तरी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरजू पालकांनी आपल्या मुलांच्या हृदयाशी संबंधित काहीही तक्रार असल्यास, या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.