Breaking : रत्नागिरीत बिबट्याची दहशत! विश्वनगरमध्ये बैलावर हल्ला? शोध मोहिमेसाठी वन विभाग घटनास्थळी दाखल

रत्नागिरी : शहरात बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील विश्वनगर परिसरात आज पुन्हा एकदा बिबट्याने दर्शन दिले असून, एका बैलावर हल्ला केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे सावट आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास विश्वनगर येथे बिबट्याने एका बैलावर हल्ला केला असे नागरिकांचे म्हणणे आहे. स्थानिकांनी हा थरार पाहिला असून परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र, रात्री नऊ वाजेपर्यंत परिसरात दाट अंधार असल्याने जखमी झालेला बैल नेमका कोठे गेला, हे समजू शकले नाही.
वन विभागाकडून शोधमोहीम सुरू
घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी तातडीने विश्वनगर परिसरात दाखल झाले आहेत. रात्रीच्या काळोखातही वन विभागाचे पथक बिबट्या आणि जखमी बैलाचा शोध घेत आहे. बिबट्या अद्याप त्याच परिसरात असण्याची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
परिसरात भीतीचे वातावरण
विशेष म्हणजे, अवघ्या दोन दिवसांपूर्वी विश्वनगरपासून जवळच असलेल्या नरहर वसाहत परिसरातही बिबट्याचे दर्शन झाले होते. त्यानंतर आता थेट वस्तीत येऊन बैलावर हल्ला केल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. “बिबट्याचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा,” अशी मागणी आता विश्वनगरमधील रहिवाशांकडून केली जात आहे.