रत्नागिरी : रत्नागिरी शहराच्या मध्यवर्ती भागाला लागून असलेल्या वसाहतींमध्ये बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. काल (शुक्रवारी) रात्री विश्वनगर येथे बिबट्याचे दर्शन आणि बैलावरील हल्ल्याच्या घटनेनंतर आज सकाळी शहरात भीतीचे वातावरण पाहायला मिळाले. एरवी सकाळच्या वेळी गजबजणाऱ्या रस्त्यांवर आज शुकशुकाट असून, मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांनीही घरातच थांबणे पसंत केले आहे.
विश्वनगरमध्ये थरार; नरहर वसाहतीतही वावर
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास विश्वनगर येथील एका आंब्याच्या बागेत बिबट्याचे दर्शन झाले. यावेळी बिबट्याने एका बैलावर हल्ला केल्याचेही बोलले जात आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे, अवघ्या दोन दिवसांपूर्वीच नरहर वसाहत भागातही रात्रीच्या वेळी बिबट्या दिसला होता. सलग घडणाऱ्या या घटनांमुळे बिबट्याचा मुक्काम शहराच्या हद्दीतच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पोलिसांच्या सुचनेचे तंतोतंत पालन
बिबट्याच्या वावराची गंभीर दखल घेत रत्नागिरी शहर पोलिसांनी काल रात्रीच नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या होत्या. “मॉर्निंग वॉकला एकटे-दुकटे बाहेर पडू नका,” या पोलिसांच्या आवाहनाचा परिणाम आज सकाळी दिसून आला. थिबा पॅलेस, विश्वनगर, आणि आंबेशेत या मॉर्निंग वॉकसाठी प्रसिद्ध असलेल्या मार्गांवर आज नीरव शांतता होती. अत्यावश्यक कामाशिवाय नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत.
रस्त्यांवर तुरळक वर्दळ
आज सकाळी नेहमीप्रमाणे दिसणारी वाहनांची आणि पादचाऱ्यांची वर्दळ अत्यंत कमी होती. बिबट्याची दहशत नागरिकांच्या मनात घर करून असून, वन विभागाने तातडीने पिंजरा लावून या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.














