लांजा : तब्बल दोन वर्षांपासून मागणी करूनही दुर्लक्ष केलेल्या आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसात कोसळलेला तालुक्यातील कणगवली येथील वीजेचा ट्रांसफार्मर (डिपी) हा अखेर गुरुवारी २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी उशीरा बसविण्यात आला आहे. उशीरा का होईना पण महावितरणने दाखविलेल्या शहाणपणामुळे तब्बल चार दिवसांनी कणगवली गावचा वीज पुरवठा सुरळीत झाला आहे. तालुक्यातील कणगवली शाळा या ठिकाणी असलेला विजेचा ट्रांसफार्मर (डिपी) हा धोकादायक स्थितीत होता. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून येथील ग्रामस्थ तसेच सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल इंगळे यांनी सातत्याने महावितरणच्या कार्यालयाकडे हा ट्रांसफार्मर तात्काळ बदलण्यात यावा अशी मागणी केली होती. गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने वारंवार महावितरण कडे याबाबत पत्र व्यवहार करुनही महावितरणकडून त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले होते.
महावितरणच्या या चालढकल धोरणामुळे सोमवारी २१ ऑक्टोबर रोजी विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह कोसळलेला पावसामुळे संपूर्ण गावाला वीज पुरवठा करणारा ट्रान्सफॉर्मर (डीपी) हा कोसळला होता. या ट्रांसफार्मरसह आजूबाजूचे विजेचे सात ते आठ खांब देखील कोसळल्याने संपूर्ण कणगवली गाव अंधारात बुडाले होते. गावातील आठ वाड्यांचा वीजपुरवठा पूर्णपणे खंडित होवून ३०० घरे अंधारात बुडाली होती.
यानंतर पुन्हा एकदा उपसरपंच विठ्ठल इंगळे यांनी महावितरणच्या लांजा कार्यालयाकडे याबाबतची माहिती देवून तातडीने ट्रान्सफॉर्मर बसविण्याची मागणी केली होती. त्यानंतर गुरुवारी २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी हा ट्रान्सफर बसविण्यात आला व चार दिवसांनी कणगवली गावचा वीज पुरवठा सुरळीत झाला. यावेळी यावेळी उपसरपंच विठ्ठल इंगळे, माजी उपसरपंच धर्मानंद मोरे, शशिकांत तिखे पोलीस पाटील सौरभ कारेकर, तसेच अंकुश इंगळे, संतोष कारेकर, संदेश कारेकर, ग्रामपंचायत सदस्य शकील वाडेकर, ग्रामस्थ सूर्यकांत इंगळे, संदीप इंगळे तसेच प्रथमेश शिंदे आदींसह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
वीज पुरवठा सुरळीत करून दिल्याबद्दल ग्रामस्थांनी महावितरणचे अधिकारी श्री. अष्टेकर व श्री. वड्डा यांचे आभार मानले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:07 PM 26/Oct/2024














